आरक्षणासाठी मोर्चा
By Admin | Updated: October 22, 2016 00:27 IST2016-10-22T00:09:37+5:302016-10-22T00:27:35+5:30
परळी : आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह न्याय-हक्कासाठी मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

आरक्षणासाठी मोर्चा
परळी : आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह न्याय-हक्कासाठी मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. युवक आणि मुलींनी नेतृत्व केलेल्या मोर्चात हजारो मुस्लिम समाजबांधवांनी सहभाग नोंदवला. व्यापारी व व्यासवसायिकांनी कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद दिला.
छोटी ईदगाह येथून दुपारी अडीच वाजता मोर्चास प्रारंभ झाला. राणी लक्ष्मीबाई टॉवर, मोंढा मार्केट, एक मिनार चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर धडकला. तेथे विद्यार्थ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीतानंतर मोर्चाची सांगता झाली. तालुक्यातील सिरसाळा, पोहनेर, मिरवट, मांडवा, कन्हेवाडी, घाटनांदूर, बर्दापूर, सुगाव आदी ठिकाणाहून नागरिक मोर्चात सामील झाले. उपस्थितांच्या हातातल्या आरक्षण व पर्सनल लॉ बोर्डचे घोषवाक्य असलेल्या फलकांनी परळीकरांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे मोर्चात कोणत्याही रंगाचे झेंडे किंवा गमचे नव्हते. मोठ्या गर्दीतही प्रचंड शिस्त पहावयास मिळाली. शांततेत पार पडलेल्या या मोर्चाची शहरासह तालुक्यात चर्चा होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
विविध संघटनांचा पाठिंबा
मुस्लिम बांधवांच्या मोर्चास सकल मराठा समाज, शिव संग्राम, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, छावा संघटना, बामसेफ, रिपाइंसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. (वार्ताहर)