कर्जाच्या पुनर्गठणासाठी मोर्चा
By Admin | Updated: August 1, 2014 00:24 IST2014-07-31T23:43:15+5:302014-08-01T00:24:47+5:30
पाथरी: गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात यावे, या मागणीसाठी ३१ जुलै रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) च्या वतीने मोर्चा
कर्जाच्या पुनर्गठणासाठी मोर्चा
पाथरी: गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात यावे, या मागणीसाठी ३१ जुलै रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) च्या वतीने मोर्चा काढण्यात येऊन राष्ट्रीयकृत बँकांना टाळे ठोकून असहकार आंदोलन करण्यात आले. सेलू कॉर्नर परिसरात पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलनकर्त्यांना अटक केली.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत राज्य सरकारने मार्च महिन्यात आदेश काढला होता. परंतु, जिल्ह्यातील बँकांनी अद्यापही शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठण करुन दिले नाही, म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने असहकार आंदोलन सुरु करण्यात आले आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून ३१ जुलै रोजी पक्षाच्या वतीने बाजार समिती परिसरातून दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात आला.
मुख्य रस्त्याने हा मोर्चा नेण्यात येऊन सेलू कॉर्नर परिसरातील स्टेट बँक आॅफ हैैदराबाद व स्टेट बँक आॅफ इंडिया या दोन शाखेला मोर्चेकऱ्यांनी टाळे ठोकले.
त्यानंतर बँक व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये विलास बाबर, दीपक लिपने यांच्यासोबत उद्धव पौळ, बालासाहेब गिराम, गोपी शिंदे, भारत फुके, राधाकिशन आव्हाड यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.(वार्ताहर)
आंदोलकांवर कारवाई
सेलू कॉर्नर परिसरात मोर्चेकरी आल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली. यावेळी कॉ.विलास बाबर, कॉ.दीपक लिपणे, कॉ.लिंबाजी कचरे यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहून पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर बळाचा वापर करुन आंदोलनकर्त्यांना बळजबरीने पोलिस व्हॅनमध्ये बसवून ठाण्यात नेले. कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर इतर कार्यकर्त्यांनी वाजतगाजत पोलिस ठाणे गाठले. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला.