मोर्चा, धरणे, निदर्शनांनी शहर दणाणले

By Admin | Updated: December 6, 2014 00:17 IST2014-12-06T00:01:37+5:302014-12-06T00:17:23+5:30

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सरकाराच्या मंत्री, नेत्यांना ‘चांगले दिवस’आले. मात्र, मागील २५ महिन्यांपासून राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा नवीन वेतनवाढीचा करार प्रलंबित आहे.

Front, dike, demonstrations made the city tremendous | मोर्चा, धरणे, निदर्शनांनी शहर दणाणले

मोर्चा, धरणे, निदर्शनांनी शहर दणाणले

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सरकाराच्या मंत्री, नेत्यांना ‘चांगले दिवस’आले. मात्र, मागील २५ महिन्यांपासून राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा नवीन वेतनवाढीचा करार प्रलंबित आहे. यासाठी देशभरात संप पुकारूनही मोदी सरकारने या विषयाकडे दुर्लक्ष केले. याच्या निषेधासाठी शुक्रवारी सर्व राष्ट्रीयीकृत बँका बंद ठेवण्यात आल्या.
सिडकोतील स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या विभागीय कार्यालयापासून रॅलीला सकाळी १0.३0 वाजता सुरुवात झाली. बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर रॅलीची सांगता झाली. बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर जाहीर सभा घेण्यात आली. स्टेट बँक आॅफ हैदराबाद स्टाफ असोसिएशनचे सरचिटणीस जगदीश भावठाणकर यांनी मागण्या मान्य न झाल्यास पुढील लढ्यासाठी सज्ज राहण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन केले. रवींद्र पिंगळीकर, प्रमोद भेंडे, हेमंत जामखेडकर यांची समयोचित भाषणे झाली.संचालन रवी धामणगावकर यांनी केले. निदर्शनात बी.एन. देशमुख, सतीश देशपांडे, बबन खर्डेकर, राजेंद्र देवळे, विजय कुलकर्णी, सुनीता गणोरकर, जयश्री जोशी, प्रमोदिनी गायाळ यांच्यासह शेकडो बँक कर्मचारी सहभागी झाले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आवाज बुलंद
औरंगाबाद : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
पैठण गेट येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. महिला आंदोलक दोन रांगा करून पुढे चालत होत्या. त्यासोबतच मोदी सरकार हाय हाय, अंगणवाडी सेविकांचे मानधन थकविणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, थकीत मानधन मिळालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा सुरू होत्या. गुलमंडी, सिटी चौक, शहागंजमार्गे हा मोर्चा दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.
या ठिकाणी मोर्चेकरी महिलांनी रस्त्यावरच ठाण मांडले. त्यामुळे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. युनियनचे अध्यक्ष राम बाहेती, तारा बनसोडे, अनिल जावळे आदींची भाषणे झाली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासूनचे थकलेले मानधन अदा करावे, मानधन अदा करण्यासाठी शासनाने मायनस सिस्टीम पूर्ववत सुरू करावी, अंगणवाडी सेविकांना मानधनाएवढा दिवाळी बोनस द्यावा, रिक्त जागा भराव्यात, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मोर्चात राम बाहेती, तारा बनसोडे, अनिल जावळे, विलास शेंगुळे, रफत सिद्दीकी, चंचल खंडागळे, प्रमिला सोनवणे, मंगला परदेशी, सुनीता भोकरे, आशा सोनवणे, मीरा आडसरे, प्रमिला शिंदे, शीला साठे, सविता अंभोरे आदी सहभागी
झाले.
कामगारविरोधी कायदे रद्द करा : क्रांतीचौकात धरणे
औरंगाबाद : कामगारविरोधी कायदे रद्द करा, कंत्राटी पद्धत रद्द करा, मोदी सरकारचे कामगारविरोधी धोरण हाणून पाडा, ईएसआयचे दवाखाने सर्व सोयींनी युक्त करा या मागण्यांसाठी आज सकाळी ११ ते ३ या वेळेत क्रांतीचौकात महाधरणे आंदोलन करण्यात आले.
५ डिसेंबर देशव्यापी विरोध दिवसाचा एक भाग म्हणून हे आंदोलन कामगार- कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले. त्यात सुमारे एक हजार कामगार- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सीटू, आयटक, बीएमएस, इंटक, विमा, बँक, दूरसंचार, वीज, राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी संघटना, सिमेन्स, घर कामगार, आशा कामगार, मिड डे मिल वर्कर, अहमदनगर फोर्जिंग कामगार कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. नंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व आपल्या अकरा मागण्यांचे निवेदन सादर केले.
महाधरणे आंदोलनाचे नेतृत्व कॉ. उद्धव भवलकर, कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, कॉ. बुद्धिनाथ बराळ, एम.ए. गफार, विठ्ठल कदम, बेंबळीकर, लक्ष्मण साक्रुडकर, दामोदर मानकापे, दीपक अहिरे, छगन साबळे, के.एन. झा, रंजन दाणी, उमेश कुलकर्णी, जगदीश भावठाणकर, ए.डी. जरारे आदींनी केले. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राजस्थान सरकारने श्रमिक कायद्यात बदल केले आहेत. हे करताना ट्रेड युनियन्सला अंधारात ठवले आहे. त्यांच्याशी कसलीही चर्चा केलेली नाही. कॉर्पोरेट हाऊसेसच्या मालकांना खुश करण्याचा हा प्रयत्न होय.
मनरेगामार्फत वर्षाला २०० दिवस काम उपलब्ध करून द्या आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

Web Title: Front, dike, demonstrations made the city tremendous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.