मित्रपक्षांनीच उठवला रिपाइंचा फायदा
By Admin | Updated: November 23, 2014 00:23 IST2014-11-23T00:16:59+5:302014-11-23T00:23:32+5:30
उस्मानाबाद : मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीसोबत राहिलो. त्यांची सत्ता आली. महापालिका निवडणुकीवेळी रिपाइंचा सेनेला फायदा झाला.

मित्रपक्षांनीच उठवला रिपाइंचा फायदा
उस्मानाबाद : मागील विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीसोबत राहिलो. त्यांची सत्ता आली. महापालिका निवडणुकीवेळी रिपाइंचा सेनेला फायदा झाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत राहिलो. पक्षाची राज्यात सत्ता आली. आमची मते मित्रपक्षांना जातात, मात्र मित्रपक्षांचा फायदा आम्हाला होत नसल्याची खंत खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
शुक्रवारी आठवले यांनी तुळजापूर येथे रिपाइं पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य सरचिटणीस राजा सरवदे, राज्य चिटणीस संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्यांच्याशी मैत्री केली त्यांनाच आम्ही प्रामाणिकपणे मतदानही केले. मात्र, मित्रपक्षांची मते त्या तुलनेत आम्हाला मिळाली नसल्याची खंत व्यक्त करीत पुण्यातील चंद्रकांता सोनकांबळे तसेच इतर काही जागांवर रिपाइं उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाले आहेत. भाजपाकडून थोडीशी रसद मिळाली असती तर येथे विजय मिळाला असता, असेही ते म्हणाले.
येणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात आश्वासन दिल्याप्रमाणे रिपाइंला दहा टक्के वाटा मिळेल, अशी आशा असल्याचे सांगून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपाकडून सन्मानाची वागणूक अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, येत्या २८ रोजी मुंबई येथे पक्षाच्या वतीने महामोर्चा काढण्यात येत असून, नगर जिल्हा अत्याचारग्रस्त जाहीर करावा. तेथील मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना पुरेसे संरक्षण पुरवावे, नगर जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या बरखास्त कराव्यात, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय बनसोडे यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जिल्ह्यात होत असलेले अत्याचाराचे प्रकार घृणास्पद असल्याचे सांगत जवखेड्यातील घटनेनंतर जामखेड येथे कैैकाडी समाजातील बाळू माने याची हत्या झाली आहे. सदर अत्याचार थांबविण्यासाठी गृह विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली.
बैठकीला जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, विद्यानंद बनसोडे, भालचंद्र कठारे, रणजीत मस्के, किशोर वाघमारे, मंगेश सुकाळे, शहाजी सोनवणे, विनायक वाघमारे, सिध्दार्थ शिंदे, आकाश बनसोडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)