पेट्रोल देण्याच्या कारणावरून मित्रांनीच पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:05 IST2021-09-27T04:05:27+5:302021-09-27T04:05:27+5:30

औरंगाबाद : दुचाकीतील पेट्रोल देण्यास नकार दिल्याबद्दल मित्रांनी तरुणाच्या अंगावर पेट्रोल फेकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना गारखेडा परिसरात मोतीनगर ...

Friends set it on fire for giving petrol | पेट्रोल देण्याच्या कारणावरून मित्रांनीच पेटविले

पेट्रोल देण्याच्या कारणावरून मित्रांनीच पेटविले

औरंगाबाद : दुचाकीतील पेट्रोल देण्यास नकार दिल्याबद्दल मित्रांनी तरुणाच्या अंगावर पेट्रोल फेकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना गारखेडा परिसरात मोतीनगर भागात घडली. या घटनेत दिनेश रुस्तमराव देशमुख (३१, रा. मोतीनगर) हा गंभीररीत्या भाजला आहे.

खासगी वाहन चालक दिनेश हा नेहमीप्रमाणे १९ सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी घरातील काम आटोपून बाहेर पडला. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा मित्र किरण बालाजी गाडगिडे त्याच्या घराजवळ आला. त्यानंतर दोघेही दारू पिण्यासाठी किरणच्या अड्ड्यावर गेले. तेथे दारू प्राशन केल्यानंतर दोघेही दिनेशच्या घराजवळील रिकाम्या प्लॉटवर आले. तेथे गप्पा मारत असतानाच दुपारी एकच्या सुमारास नितीन सोनवणे व भागवत गायकवाड तेथे आले.

त्यापैकी नितीनने दुचाकीसाठी थोडे पेट्रोल दे, अशी दिनेकशकडे मागणी केली. दिनेशने त्यास नकार दिला. मात्र, किरणच्या सांगण्यावरून दिनेशने नितीनला दुचाकीची चावी देत पेट्रोल काढण्यास सांगितले. नितीनने पेट्रोल काढल्यानंतर पुन्हा आणखी पेट्रोलची मागणी केली. तेव्हा मात्र दिनेशने नकार दिला. त्याचा राग आल्याने भागवतने चिथावणी देत नितीनला त्याच्या अंगावर पेट्रोल फेकण्यास परावृत्त केले. नितीनने पेट्रोल फेकताच किरणने माचिसची पेटलेली काडी त्याच्या अंगावर फेकली. या घटनेत दिनेश २५ टक्के भाजला. त्याला कुटुंबीयांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात होताच पोलिसांनी दिनेशचा जबाब नोंदविला. त्याच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे करीत आहेत.

Web Title: Friends set it on fire for giving petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.