पक्षीसंवर्धन लोकचळवळ व्हावी

By Admin | Updated: January 15, 2016 23:56 IST2016-01-15T23:52:06+5:302016-01-15T23:56:32+5:30

औरंगाबाद : संगणकाची कळ दाबताच व्यासपीठावरील पडद्यावर रंगीबेरंगी पक्षी अवतरले. त्यांचा किलबिलाट व विशिष्ट आवाज सभागृहात पसरला.

Freshwater harvesting should be done | पक्षीसंवर्धन लोकचळवळ व्हावी

पक्षीसंवर्धन लोकचळवळ व्हावी

औरंगाबाद : संगणकाची कळ दाबताच व्यासपीठावरील पडद्यावर रंगीबेरंगी पक्षी अवतरले. त्यांचा किलबिलाट व विशिष्ट आवाज सभागृहात पसरला. पक्ष्यांच्या निनादाने, त्यांच्या प्रसन्न दर्शनाने वातावरण आनंदित झाले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत याचे स्वागत केले, अशा अनोख्या पद्धतीने पक्षी महोत्सवाचे शुक्रवारी (दि.१५) येथे उद्घाटन झाले. पक्षीसंवर्धन ही लोकचळवळ व्हावी, असा सूर याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन अ‍ॅण्ड एज्युकेशनल अकॅडमी, कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स यांच्या वतीने स्व. भानुदासराव चव्हाण सभागृहात आयोजित पक्षी महोत्सवाचे उद्घाटन मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाचे उपमहासंचालक जी.टी. चव्हाण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक राजू कसंबे, ख्यातनाम वाईल्ड लाईफ फोटोग्राफर विभास आमोणकर, पक्षीमित्र प्रा. दिलीप यार्दी, कंदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘रासायनिक खतांचा बेसुमार वापर, पिकांवर केली जाणारी विषारी औषधांची फवारणी, प्लास्टिकचा अनिर्बंध वापर, औद्योगिक व इतर प्रदूषण, अशा अनेक कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलनच बिघडले आहे. याच्याच परिणामी पक्षी- प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या संवेदनशील नागरिकांनी आता पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे,’ असे चौधरी यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण हे आपल्या भोवतीचे संरक्षक कवच आहे. प्रदूषण, वृक्षतोड यातून आपण पर्यावरणालाच तडा देत आहोत. पक्षी- प्राण्यांची जैविक साखळीच यामुळे तुटत आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी. पक्षी महोत्सवातून हाच हेतू साध्य होण्यास मदत होईल, असे चव्हाण यांनी सांगितले. पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व आणि त्यांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत आमोणकर यांनी उपयुक्त माहिती दिली. प्रा. यार्दी यांनी प्रास्ताविक केले.
शहरातच जास्त पक्षी
जंगलापेक्षाही शहरातच पक्ष्यांची संख्या जास्त असल्याचा दावा कसंबे यांनी केला. चिमण्या कमी झाल्याची ओरड केली जाते; परंतु यात तथ्य नाही. कारण चिमण्यांची गणनाच कधी झालेली नसल्याने त्या कमी झाल्या, हे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. चिमण्यांसह शहरातील पक्ष्यांची गणना करण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title: Freshwater harvesting should be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.