औरंगाबाद : जिल्ह्यात कधी वादळवारा, पाऊस तर कधी नादुरुस्तीमुळे अचानक वीजपुरवठा खंडित होतो. अशावेळी वीज येण्याची नुसती प्रतीक्षा करावी लागते. काही भागांत कधी-कधी वारंवार वीज जाते. यासंदर्भात महावितरणकडे तक्रार करायची असते; परंतु अनेक ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयाचा नंबरच माहीत नसतो. तक्रार करण्यासाठी कार्यालयात जाण्याचाही कंटाळा येतो. परंतु, तक्रार करण्यासह विविध सुविधांसाठी महावितरणने ॲप सुरू केले. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयात न जाताही ग्राहकांच्या समस्या सुटण्यास मदत होत असल्याचे महावितरणने सांगितले.
जिल्ह्यात सहा लाख घरगुती ग्राहकजिल्ह्यात महावितरणचे ६ लाख ५० हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. औद्योगिक, व्यावसायिक, कृषी ग्राहकांची संख्या वेगळी आहे.
अनेक ग्राहकांनी डाऊनलोड केला ॲपगुगल प्ले स्टोअरवरून महावितरणचे मोबाईल ॲप डाऊनलोड करता येतो. आतापर्यंत राज्यातील ५० लाखांवर ग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.
महावितरणचा ॲप डाऊनलोड कसा कराल?गुगल प्ले स्टोर, ॲपल ॲप स्टोअर आणि महावितरण वेबसाईटवरून महावितरणचे ॲप डाऊनलोड करता येते. ॲप डाऊनलोड केल्यानंतर गेस्ट अथवा महावितरणचा १२ अंकी ग्राहक क्रमांक टाकून ॲपमध्ये लॉगिन करता येते.
ॲपवर काय सुविधा?महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे वीज देयक भरणा करता येते. तसेच यापूर्वी भरलेल्या वीज देयकाची माहिती पाहता येऊ शकते. ॲपवर कृषी वीज योजना-२०२० ची माहिती, वीज वापरानुसार वीज देयक बरोबर आहे का, याबाबत तपासणी, मीटर रीडिंग एजन्सीने रीडिंग घेतले नसेल तर मीटर रीडिंग देण्याची सुविधा, ग्राहकाच्या घराजवळील कार्यालये, वीज बिल भरणा केंद्रे, नवीन जोडणी-अर्जाची सद्य:स्थिती, पुनर्जोडणी शुल्काबाबत, पारेषणविरहित सौर कृषी पंप अर्जाची सद्य:स्थिती, गो ग्रीन, ग्राहक सेवा केंद्र इ.ची माहिती आहे. तसेच वीज चोरी कळविण्याची सोय या ॲपमध्ये उपलब्ध आहे. ॲपमध्ये ग्राहक सेवेशी संबंधित संपर्क क्रमांक व ई-मेल दिले असून, त्याद्वारे ग्राहक आपली तक्रार अथवा समस्यांची सोडवणूक करू शकतो.
ॲपचा वापर करावाजास्तीत जास्त ग्राहकांनी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.