वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात उभ्या केलेल्या वाहनातून फ्रीजची चोरी करणारी टोळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने शनिवारी जेरबंद केली. यात वळदगावच्या माजी सरपंचाच्या मुलासह ६ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ७० हजार ६०६ रुपयांचे ४ फ्र ीज जप्त करण्यात आले. आरोपींना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ट्रकचालक कृष्णा दराडे यांनी बुधवारी पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून ट्रक (क्रमांक एमएच-२३ डब्ल्यू-२९४५)मध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन इ. माल भरला. तो माल वाळूज औद्योगिक क्षेत्र व शहरात पोहोचता करण्यासाठी गुरुवारी सकाळी ते वाळूज औद्योगिक क्षेत्रात पोहोचले. वैष्णोदेवी उद्यानाजवळ ट्रक उभा करून ते बजाजनगरातील मित्राच्या घरी गेले. सकाळी ९.४५ वाजेदरम्यान ट्रकजवळ आले असता त्यांना ट्रकमधील ४ फ्रीज गायब झाले असल्याचे आढळले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ठाण्यातील डीबी पथकाने तपासाची चक्रे गतिमान करून फ्रीजची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करीत ६ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. अटक केलेल्यांत वळदगावचे माजी सरपंच कैलास चुंगडे यांचा मुलगा गणेश चुंगडे (२३) याच्यासह भाऊराव दाभाडे (२५), कृष्णा पंडित (१९), राहुल घोडके (२२), अमर डांगर-राजपूत (२४) सर्व रा. वळदगाव व माणिक पवार (२२, रा. रिसनगाव ता. लोहा ह.मु. बी-३६ एमआयडीसी वाळूज) यांचा समावेश आहे. आरोपीच्या ताब्यातून त्यांनी चोरलेले ७० हजार ६०६ रुपयांचे चारही फ्रीज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकप्रमुख फौजदार प्रवीण पाटील, पोहेकॉ. वसंत शेळके, पोना. भागीनाथ बोडखे, भगवान जगताप, पोशि. योगेश कुलकर्णी, अनिल तुपे, अनिल पवार यांनी केली.
फ्रीज चोरणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: December 28, 2015 00:26 IST