दागिने विकून गावाला मोफत पाणीपुरवठा
By Admin | Updated: April 18, 2016 00:52 IST2016-04-18T00:48:21+5:302016-04-18T00:52:52+5:30
उस्मानाबाद : निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ गावा-गावातील अनेक

दागिने विकून गावाला मोफत पाणीपुरवठा
उस्मानाबाद : निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ गावा-गावातील अनेक नागरिकांनी आपापल्या खासगी कुपनलिकेद्वारे गावाला मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे़ अशाच पध्दतीने तोरंबा (हराळी़ ता़लोहारा) येथील भालेराव दाम्पत्यांनी गावाला मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे़ विशेष म्हणजे पाणीपुरवठ्याची मोठी टाकी खरेदी करण्यासाठी घरातील दागिने विकून या दाम्पत्याने पैसा उभा केला असून, भालेराव दाम्पत्याच्या या उपक्रमामुळे गावातील पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे़
लोहारा तालुक्यातील तोरंबा (हराळी) येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावातील नागरिकांची भटकंती सुरू आहे़ नागरिकांची ही भटकंती पाहता तोरंबा (हराळी) येथील देविदास काशिनाथ भालेराव यांनी घरातील कुपनलिकेद्वारे गावाला मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला़ मागील वर्षीच्या टंचाई कालावधीत भालेराव यांनी कुपनलिका घेतली होती़ सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत त्यांच्या कुपनलिकेला पाणी चांगले आहे़ गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी १० हजार लिटर क्षमतेची टाकी खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता़ मात्र, आर्थिक अडचण येत असल्याने भालेराव यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता़ त्यावेळी त्यांच्या पत्नी इंदुमती भालेराव यांनी त्यांच्या कानातील सोन्याचे कर्णफुले, झुमके मोडून टाकी खरेदी करण्यासाठी भालेराव यांना पैसे दिले़ इंदुमती भालेराव यांच्या मदतीमुळे नवीन टाकी खरेदी करण्यात आली असून, त्या टाकीत कुपनलिकेचे पाणी सोडून गावाला मोफत पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे़ भालेराव दाम्पत्याच्या या उपक्रमामुळे गावातील पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे़ या उपक्रमाचे आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ कार्यक्रमास सरपंच भलीबापू, किशोर साठे, शिवाजी दुनगे, यादव चव्हाण, तात्याराव चव्हाण, दादा रणखांब, सुधाकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ भालेराव दाम्पत्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे़ (प्रतिनिधी)