बोअरवेलवरून मोफत पाणी पुरवठा
By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:44+5:302015-12-14T23:53:04+5:30
विजय माने , परंडा आजमितीस शहरवासियांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे

बोअरवेलवरून मोफत पाणी पुरवठा
विजय माने , परंडा
आजमितीस शहरवासियांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. अशा भीषण परिस्थितीत स्वखर्चातून जलस्त्रोताची निर्मिती करून नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी परंडा येथील माजी नगराध्यक्षा नसरीन शहाबर्फीवाले आणि नगरसेविका जैतूनबी पठाण यांनी पुढाकार घेतला असून, टंचाईच्या काळात त्या शहरवासियांसाठी मोठ्या आधारवड ठरत आहेत.
सीना जॅकवेल व खासापुरी जलस्त्रोत निकामी झाल्याने तोकड्या टँकरच्या आधारावर सद्यस्थितीत परंडा शहरवासियांना पालिकेकडून दर पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. काही नागरिक परंडा शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागात तीन ते चार किमीची पायपीट करीत आहेत. अशा टंचाईच्या काळात भीमनगर, शहाबर्फीवाले गल्ली, मंगळवार पेठ या भागातील नागरिकांना माजी नगराध्यक्षा नसरिन शहाबर्फीवाले यांनी स्वखर्चातून घेतलेल्या विंधनविहिरीचा चांगला आधार मिळाला आहे. या विंधन विहिरीला चांगले पाणी लागल्याने दोन महिन्यांपासून नागरिकांचा पाण्यावर होणारा खर्च वाचला आहे. शहराच्या उत्तर पट्ट्यातही नगरसेविका जैतूनबी पठाण यांनी स्वखर्चातून विंधन विहीर घेतली. तसेच नागरिकांना पाणी मिळणे सुलभ व्हावे यासाठी जलवाहिनी टाकून आण्णाभाऊ साठेनगर, मोमीन गल्ली, आगरकर गल्ली, राजापुरा गल्ली या भागासाठी तीन ठिकाणी स्टँडपोस्ट बसविले आहेत. या दोन महिला पाण्यासाठी सरसावल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माजी नगराध्यक्षा नसरिन शहाबर्फीवाले यांनी शहाबर्फीवाले गल्लीच्या एका खुल्या जागेत स्वखर्चातून ४०० फूट खोलीवर कूपनलिका घेऊन त्यास विद्युत मोटार बसविली आहे. या बोअरला अडीच इंच पाणी लागले आहे. सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा बोअर सुरू करून तीन तास परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. नालसहाब गल्ली, भीमनगर, शहाबर्फीवाले गल्ली, मंगळवार पेठेच्या काही भागातील नागरिकांना प्रति एक कुटुंब ५ घागर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. याकामी सकाळी ८ ते ११ वाजेच्या दरम्यान स्वत: नसरिन शहाबर्फीवाले या समोर उभा राहून नियोजनबद्ध पाणी वाटप करीत आहेत.
शहरातील मंडईपेठ, मोमीनगल्ली परिसराच्या नगरसेविका जैतूनबी पठाण यांनीही स्वत:च्या घरासमोरील जागेत स्वखर्चाने बोअर घेतला आहे. टंचाईच्या काळात या बोअरला चार इंची पाणी लागले आहे. त्यांनी बोअरवर विद्युत मोटार बसवून आण्णाभाऊ साठेनगर या ठिकाणी पाईपलाईन टाकून स्टँडपोस्ट उभा केला आहे. सकाळी नऊ वाजता साठेनगरात दीड तास पाणी सोडले जाते तर सायंकाळी ४ वाजता मोमीन गल्ली व सकाळी आठ वाजता आगरकर गल्लीला दीड तास पाणी नियोजनबद्ध रित्या सोडले जात आहे. एकूणच नगरसेवक आणि माजी नगराध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शहरवासियांना ऐन टंचाई काळात चांगला आधार मिळाला आहे.