जुन्या नांदेडसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र
By Admin | Updated: June 24, 2017 23:49 IST2017-06-24T23:47:44+5:302017-06-24T23:49:10+5:30
नांदेड: गेल्या दहा वर्षांपासून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या असलेल्या जुन्या नांदेडचा प्रश्न आता सुटणार आहे़

जुन्या नांदेडसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: गेल्या दहा वर्षांपासून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या असलेल्या जुन्या नांदेडचा प्रश्न आता सुटणार आहे़ मनपाच्या सर्वसाधारण सभेने जुने नांदेड भागात ३५ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यास एकमुखाने मंजुरी दिली असून त्यामुळे या भागातील जवळपास दोन लाख नागरिकांना आता शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे़
नांदेड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ शहराला लागून असलेल्या नवीन वस्त्यांची पाण्याची मागणीही वाढत चालली आहे़ एकट्या विष्णूपुरीवर नांदेडची तहान भागविणे अशक्य असल्यामुळे आसनातून पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ आजघडीला शहरात डंकीन येथे २७ एमएलडी, काबरानगर येथे ३५ व ६० एमएलडी असे दोन, असदवन येथे ३५ एमएलडी अशी एकूण चार जलशुद्धीकरण केंदे्र आहेत़ त्या केंद्रातूनच नांदेडकरांची तहान भागविण्यात येते़ डंकीन केंद्रातून रेल्वेस्टेशन, गोकुळनगर, शिवाजीनगर, काबरानगर येथून उत्तर नांदेडला तर असदवन येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नवीन नांदेड आणि जुन्या नांदेड भागात पाणीपुरवठा करण्यात येतो़ असदवन येथील केंद्रातून नवीन नांदेडला पाणीपुरवठा केल्यानंतर जुन्या नांदेडसाठी पाणी सोडण्यात येते़ त्यामुळे जवळपास दोन लाख लोकसंख्या असलेल्या या भागात सणासुदीच्या काळातही पाणीटंचाईचा तसेच दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता़
गुरु-त्ता-गद्दीच्या काळात नांदेडात पाणीपुरवठ्याचे काम करण्यात आले होते़ परंतु त्याहीवेळी जुन्या नांदेड भागासाठी तात्पुरती व्यवस्था असदवन येथूनच करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे, जुन्या नांदेड भागातील जलवाहिन्या या अनेक वर्षांपूर्वीच्या असून ठिकठिकाणी त्याला गळती लागली आहे़ त्यामुळे या भागाला गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने दूषित पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत होती़ याबाबत अनेकवेळा या भागातील नागरिकांनी आंदोलनेही केली़ पाणीपुरवठ्याच्या या समस्येबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रफतउल्लाखान यांनी नवीन जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव ठेवला होता़
या प्रस्तावाला नगरसेवकांनीही उचलून धरले़ या विषयावर मनपाच्या सर्वसाधारण सभेनेही सकारात्मक भूमिका घेत जुन्या नांदेड भागासाठी ३५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे़ हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून लवकरच या भागात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे़ त्यामुळे वर्षानुवर्षांचा जुन्या नांदेडातील रहिवाशांचा दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटणार आहे़