रंगांची मुक्त उधळण!
By Admin | Updated: March 18, 2017 00:08 IST2017-03-18T00:06:55+5:302017-03-18T00:08:20+5:30
उस्मानाबाद शहरात यंदा रंगपंचमीनिमित्त प्रमुख बाजारपेठेसह चौका-चौकात रंगांचे स्टॉल्स सजले होते

रंगांची मुक्त उधळण!
उस्मानाबाद शहरात यंदा रंगपंचमीनिमित्त प्रमुख बाजारपेठेसह चौका-चौकात रंगांचे स्टॉल्स सजले होते. विविध कोरड्या रंगांच्या स्टॉल्सवर तरुणाईची खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. तरुणाईकडून कोरड्या रंगांनाा अधिक मागणी होती. गुलाबी, हिरवा, पिवळ्या रंगांनी माखलेले चेहरे दिसत होते. शहरातील बाजारपेठ तसेच रस्त्यांवरील दुकाने दिवसभर बंदच होती.
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे शुक्रवारी सकाळी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीला दहीदूध पंचामृत अभिषेक करण्यात आला़ त्यानंतर वस्त्रालंकार घालण्यात आले. त्यानंतर देवीच्या अंगावरील वस्त्रांवर गुलाबी, भगवा, पिवळ्यासह सप्तरंग शिंपडण्यात आले़ त्यानंतर शहरासह परिसरात रंग खेळण्यास प्रारंभ झाला. देवीला पुरणावळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी भोपी पुजारी अमर परमेश्वरसह पुजारी उपस्थित होते़ शहरातील बच्चे कंपनी रंग खेळण्यासाठी सकाळपासून रस्त्यावर उतरली होती. दुपारनंतर रंगपंचमी खेळण्यास उधाण आले.
जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात शुक्रवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़ सकाळपासूनच बच्चेकंपनींसह युवकांनी एकमेकांना रंग लावण्यास सुरूवात केली होती़ महिलांसह युवतींनीही रंगपंचमीनिमित्त विविध रंगांची मुक्त उधळण केली़ तरूणाईने कोरडा रंग खेळण्यावर भर दिला.
भारतीय संस्कृतीनुसार रंगपंचमीचा सण फाल्गुन मासात येतो. याच कालावधीत वसंत ऋतूचे आगमन होत असल्याने या सणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. यंदा मुबलक पाण्याची उपलब्धता असली तरी कोरडा रंग खेळण्यात यावा, नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनासह विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात आले होते़ या आवाहनाला शहरासह जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले़ विशेषत: गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीपेक्षा यंदा मुबलक प्रमाणात पाणी असले तरी कोरडा रंग खेळण्यावर अनेकांनी भर दिला होता़ उस्मानाबाद शहरातील चौका-चौकात युवकांचे ग्रुप शुक्रवारी सकाळपासूनच एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करीत होते़ तर बच्चे कंपनीचीही एक वेगळीच धमाल दिसून आली़ काही ठिकाणी गीतांच्या तालावर नृत्य करणारी तरुणाईही दिसून आली़ विविध भागातील महिलांसह युवतींनीही रंगपंचमीनिमित्त एकमेकींना रंग लावून आनंदोत्सव साजरा केला़़ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही रंगपंचमीचा उत्साह दिसून आला़ उमरगा शहरात पहाटेपासूनच बालगोपालांनी विविध पंगांच्या पिचकाऱ्या भरून एकमेकांवर रंग टाकण्यास सुरूवात केली होती़ दिवसभर शहरातील विविध भागांत युवकांनी डीजेसह विविध गीतांच्या तालावर थिरकत रंगपंचमी साजरी केली़ तर गल्लोगल्लीतील महिलांनीही रंगाची उधळण केली. शहरातील काही भागातील युवकांनी रंगाची हंडी उंचावर बांधून फोडण्याची शर्यत ठेवली होती़ याला तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला. सायंकाळी उशिरापर्यंत रंगपंचमीचा उत्साह कायम होता़