रक्त मोफत, पण कीट विकत
By Admin | Updated: May 24, 2017 00:28 IST2017-05-24T00:27:27+5:302017-05-24T00:28:15+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयात रक्त घेण्यासाठी आलेल्या रुग्ण नातेवाईकांना रक्त मोफत मिळते मात्र रक्तसंक्रमण दरम्यान लागणारी रक्त कीट खाजगी मेडीकलमधून विकत घेण्यासाठी सांगितले जाते.

रक्त मोफत, पण कीट विकत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयात रक्त घेण्यासाठी आलेल्या रुग्ण नातेवाईकांना रक्त मोफत मिळते मात्र रक्तसंक्रमण दरम्यान लागणारी रक्त कीट खाजगी मेडीकलमधून विकत घेण्यासाठी सांगितले जाते. एकीकडे सध्या जिल्हा रुग्णालयात पं. दीनदयाळ उपाध्याय स्वास्थ्य अभियान शासन राबवित आहे तर दुसरीकडे ब्लडसेटसारखे साहित्य बाहेरून विकत घेण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असते. अशा स्थितीत त्या रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळणे अपेक्षित असते. शासनस्तरावर वेगवेगळे आरोग्य शिबीर घेतले जातात. या शिबिराचे राजकीय भांडवल केले जाते.
बीड जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील येणाऱ्या रुग्णांची मोठी संख्या आहे.
वेगवेगळ्या आजारांमध्ये रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांना रक्त मोफत आहे. मात्र ब्लड कीट विकत आणावे लागत आहे. एक ब्लड कीट ९० ते १०० रुपयांना विकत मिळते. दिवसाकाठी १०० च्या जवळपास रुग्णांना वेगवेगळ्या आजारांसाठी रक्त द्यावे लागते. अशा परिस्थितीत गोरगरिब रुग्णांच्या खिशाला झळ पोहचत आहे.
एकीकडे जिल्हा रुग्णालयात पं.दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ आरोग्य अभियान राबविले जात आहे तर दुसरीकडे जुजबी सुविधांकडे येथील रुग्णालय प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांत असंतोष आहे.