छत्रपती संभाजीनगर : सचखंड गुरुद्वाराला भाविकांनी भेट स्वरूपात दान दिलेले बहुमूल्य दागिने वितळवून गैरव्यवहार केल्याबाबतचा अंतिम चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार ३१ मार्चपर्यंत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.जी. मेहरे आणि न्या. शैलेश पी. ब्रह्मे यांंनी दिले.
काय आहे याचिकायासंदर्भात रणजितसिंघ व राजेंद्रसिंघ पुजारी यांनी ॲड. वासिफ शेख यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेनुसार शीख धर्मीयांचे पवित्र स्थळ असलेल्या नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. श्रद्धेपोटी भाविकांकडून गुरुद्वारा बोर्डाला हिरे-मोती, सोने-चांदीचे दागिने भेट स्वरूपात दान दिले जातात. अशाप्रकारे १९७० ते २०२० दरम्यान प्राप्त झालेले सोने-चांदी वितळवून अशुद्ध, कमी वजनाचे सोने जमा केल्याचा आरोप करीत याचिकाकर्त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.
चौकशी समितीसदर कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. यामध्ये सदस्य म्हणून महानगरपालिकेचे लेखाधिकारी, गुरुद्वारातील २ पंच प्यारे, वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक व पीएनजी ज्वेलर्सच्या नागपूर व पुणे शाखेतील नियुक्त कर्मचारी आणि सदस्य सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांचा समावेश आहे.
...म्हणून ३१ मार्चपर्यंतचा कालावधी लागणारतक्रारीच्या अनुषंगाने मागविलेल्या सोन्याच्या ठिकाणांच्या व्हिडीओचा डाटा ३०० जी.बी. पेक्षा जादा असल्यामुळे पाहणीसाठी नेमलेल्या पथकाचे कामकाज ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण होईल. सोन्याच्या तपासणीसाठी १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वेळ लागणार असल्याचे तपासणीकरिता नेमलेल्या पीएनजी ज्वेलर्स यांंनी कळविले आहे. सदर वादग्रस्त सोन्याचे अभिलेख पंजाबी भाषेत आहेत. त्यांचे मराठीत भाषांतर करुन तपासणी करणे आवश्यक आहे. याचिकाकर्त्यांच्या तक्रारीची नांदेडचे पोलिस अधीक्षक चौकशी करीत आहेत. गुरुद्वारातील सोन्याचा विषय धार्मिक स्वरुपाचा असल्याने धार्मिक संघटना व भागधारकांना विश्वासात घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे. सदर चौकशी तांत्रिक स्वरुपाची असल्याने ज्वेलर्सकडून तपासणी अहवाल मिळविणे आवश्यक आहे. तो प्राप्त झाल्यानंतरच समितीचा अंतिम चौकशी अहवाल सादर करण्यास ३१ मार्च २०२५ पर्यंतचा कालावधी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.