बोगस कार्डधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By Admin | Updated: February 10, 2015 00:30 IST2015-02-10T00:00:57+5:302015-02-10T00:30:46+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार लातूर विभागाच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे यांनी दोन बोगस कार्डधारकांविरुद्ध

बोगस कार्डधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
बाळासाहेब जाधव , लातूर
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार लातूर विभागाच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे यांनी दोन बोगस कार्डधारकांविरुद्ध शिवाजी नगर पोलिसात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे़
एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर या पाचही आगाराअंतर्गत तीन पथकातील अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई सुरु केली होती़ परंतु, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बोगस कार्डधारक आढळून येताच संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही गुन्हा दाखल करण्याच्या कामात गती येत नव्हती, याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच अनेक बोगस कार्ड जप्त करुन २ लाख ५० हजाराचा दंड वसूल करण्यात आला़ तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी ४़२० वाजता एमएच २० बीएल २८८७ पुणे ते लातूर या मार्गावर शिवाजी चौक लातूर येथे बस थांब्यावर प्रवाशी उतरत असताना सहाय्यक वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे, एम़ए़पाटील, जी़बी़ ढेकणे, आऱईक़ांबळे, चालक ओ़बी़गिरी यांच्या उपस्थितीत पथकाने अपंग व ज्येष्ठ नागरिक बनावट ओळखपत्राची तपासणी करुन बाभळगाव येथील बबन ज्ञानदीप मिस्के व अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील दिनकर श्रीनिवास गादेवार यांच्याकडील बनावट अपंगाचे कार्ड जप्त करण्यात आले़ या प्रकरणी एसटीचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे यांनी शिवाजी नगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दोघाविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
एसटी महामंडळाच्या वतीने बोगस कार्ड जप्त करण्यात आले असून, दंडापोटी २ लाख ५० हजार रुपये वसूल करण्यात आले़ परंतु गुन्हा दाखल करण्यास अडचणी येत होत्या़ परिवहन मंत्र्यांनी आदेश दिल्याने सोमवारी दुपारी अपंगाचे बनावट कार्ड वापरणाऱ्या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ मराठवाड्यातील ही पहिलीच गुन्हा दाखल करण्याची घटना आहे़