भूखंडाच्या व्यवहारातून फसवणूक
By Admin | Updated: August 8, 2016 00:27 IST2016-08-08T00:25:53+5:302016-08-08T00:27:54+5:30
औरंगाबाद : मूर्तिजापूर येथील दुसऱ्याच्या भूखंडाचा परस्पर सौदा करून एका महिलेची १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

भूखंडाच्या व्यवहारातून फसवणूक
औरंगाबाद : मूर्तिजापूर येथील दुसऱ्याच्या भूखंडाचा परस्पर सौदा करून एका महिलेची १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख लाल शेख दादा आणि घनश्याम तापडिया (रा. सिडको एन-७) अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर येथील रहिवासी असलेल्या महिलेस भूखंड खरेदी करायचा होता.
आरोपींनी मूर्तिजापूर येथील एक भूखंड त्यांना दाखवला. तो भूखंड त्यांनी सव्वा लाख रुपयांत खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. या भूखंडाची कागदपत्रे तुम्हाला आठवड्यात देतो, असे त्यांनी तिला सांगितले.
आरोपींवर विश्वास ठेवून महिलेने आरोपींना १ लाख २५ हजार रुपये दिले. त्यानंतर त्या भूखंडावर गेल्या असता तेथे दुसरीच मार्किंग केलेली दिसली. या भूखंडाच्या मालकीबाबत काही तरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरोपींकडे विचारणा केली असता त्यांनी कागदपत्रे अथवा पैसे देण्यास टाळाटाळ केली. चार महिन्यांपासून आरोपी त्यांना पैसे देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी मुकुंदवाडी ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक मिरधे तपास करीत आहेत.