विहिरीत पडून कोल्ह्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST2021-06-09T04:06:41+5:302021-06-09T04:06:41+5:30
हतनूर : हतनूर शिवारातील गट क्रमांक ५० एका शेतात असलेल्या विहिरीत पडून कोल्ह्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे ...

विहिरीत पडून कोल्ह्याचा मृत्यू
हतनूर : हतनूर शिवारातील गट क्रमांक ५० एका शेतात असलेल्या विहिरीत पडून कोल्ह्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोल्हा विहिरीत पडल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्याला देऊन देखील तब्बल दोन तासांनी वनकर्मचारी दाखल झाले. त्यांनी केलेल्या निष्काळजीपणामुळेच वन्यप्राणी पाण्यात तडफडून मृत झाल्याचा आरोप हतनूर गावकऱ्यांकडून करण्यात आला.
हतनूर शिवारातून गेलेल्या शिवना नदीच्या काठी नारायण काळे यांच्या शेतात कठडे नसलेली विहीर आहे. पाण्याच्या शोधात आलेला कोल्हा या विहिरीत मंगळवारी सकाळीच पडला. दरम्यान, नारायण काळे यांचा मुलगा सागर काळे हा शेतावर गेल्यानंतर त्याला विहिरीच्या पाण्यात कोल्हा पडलेला दिसला. तो जिवंत असून जीव वाचविण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. तत्परता दाखवत सागरने वनविभागास संपर्क करून माहिती दिली. तसेच कोल्ह्याला वाचविण्यासाठी गावातील नागरिकांना फोनवरून संपर्क केला. तेव्हा आजूबाजूच्या शेतावर येणारे शेतकरी या ठिकाणी धावत आले. नागरिकांकडे असलेल्या अपुऱ्या सुविधेअभावी कोल्ह्याला वाचविण्यात त्यांनादेखील यश आले नाही. अखेर कोल्ह्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
---
वन्यप्राण्याला जीव गमवावा लागला
दोन तास उलटून देखील वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. गावकरी करीत असलेल्या प्रयत्नाच्या वेळेत जर वनकर्मचारी दाखल झाले असते, तर त्यांच्याकडील साहित्याच्या मदतीने वन्यप्राण्याला वाचविणे शक्य झाले असते. परंतु नेहमीप्रमाणे उशिरा दाखल होऊन वनकर्मचाऱ्यांनी आपली ओळख कायम ठेवली. यात मात्र वन्यप्राण्याला जीव गमवावा लागला. वनविभागाच्या शीघ्र कृती दलाचे एम. ए. शेख, वनपाल अमोल वाघमारे यांनी मृत कोल्ह्याला बाहेर काढून पंचनामा केला.
-----
विहिरीला नाही कठडा
ही विहीर नारायण काळे यांच्या शेतात असली तरी ती दुसऱ्याला विक्री केली आहे. या विहिरीला कठडे नसल्याने वन्यप्राण्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विहिरीला कुंपण अथवा कठडे असते तर कोल्ह्याचा जीव वाचला असता.
--
फोटो :