चौथ्या आरोपीचा शोध सुरु
By Admin | Updated: December 31, 2015 13:36 IST2015-12-31T13:23:36+5:302015-12-31T13:36:20+5:30
पाथरी -सेलू रस्त्यावर तीन आखाड्यावर दरोडेखोरांनी सोमवारी रात्री धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून चौथ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले

चौथ्या आरोपीचा शोध सुरु
पाथरी : पाथरी -सेलू रस्त्यावर तीन आखाड्यावर दरोडेखोरांनी सोमवारी रात्री धुमाकूळ घातला होता. या घटनेत अवघ्या काही तासांत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून आता चौथ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे.
पाथरी- सेलू रस्त्यावरील बांदरवाडा शिवारातील तीन आखाड्यावर दरोडेखोरांनी सोमवारच्या रात्री धुमाकूळ घातला होता. शस्त्रांनी वार केल्याने यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून एका गर्भवती महिलेवरही अत्याचार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी गांभिर्य ओळखत या प्रकरणात सुनील शेषराव शिंदे, अनिल उत्तम पवार आणि रवि भास्कर पवार या तिघांना अटक केली होती. आणखी एक संशयितही ताब्यात घेतला होता. बुधवारी दिवसभर पोलिसांनी कसून तपास केला. परंतु, संशयिताकडून काही हाती लागले नाही. पकडलेल्या इतर तीन आरोपींकडून मिळालेल्या वर्णनानुसार पोलिस आता चौथ्या आरोपीचा शोध घेत आहेत. या आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेत जखमी झालेले अशोक पितळे, दामोधर पितळे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
पीडितास न्याय मिळवून देणार -फौजिया खान
दरम्यान, ३0 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांनी घटनास्थळाला भेट दिली. खेडूळा बलात्कार व दरोडा प्रकरण गंभीर असून पीडितांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खेडूळा पाटी येथील दोन्ही आखाड्यावर भेट देऊन हम्मू चाऊस यांच्या शेतातील घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली. यावेळी परिवर्तन विकासमंचचे सईद खान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव सोनाली देशमुख आदींची उपस्थिती होती. डॉ.खान यांनी पाथरी पोलिस ठाण्याला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पोलिस निरीक्षक नृसिंह ठाकूर यांची भेट घेऊन चर्चा केली.