चौदा वर्षांनंतर तिने ऐकला आवाज..

By Admin | Updated: November 20, 2014 14:52 IST2014-11-20T14:52:31+5:302014-11-20T14:52:31+5:30

पक्ष्यांची /किलबिल असो की वाहनांचा गोंगाट, घरातील गलबलाट असो की कोणी प्रेमाने लडीवाळपणे दिलेली हाक असो.. या सर्व कर्णमधुर, कर्णकर्कश आवाजापासून ती फार दूर होती.

Fourteen years later she heard the voice .. | चौदा वर्षांनंतर तिने ऐकला आवाज..

चौदा वर्षांनंतर तिने ऐकला आवाज..

>विलास चव्हाण / परभणी
 
पक्ष्यांची /किलबिल असो की वाहनांचा गोंगाट, घरातील गलबलाट असो की कोणी प्रेमाने लडीवाळपणे दिलेली हाक असो.. या सर्व कर्णमधुर, कर्णकर्कश आवाजापासून ती फार दूर होती. जन्मापासूनच एका कानाची बधिरता आणि दुसर्‍या कानाने अत्यंत कमी ऐकू येत असल्याने निसर्गाच्या सुसंवादापासून ती वंचित होती. 
परभणीच्या जिल्हा रुग्णालयात या मुलीच्या कानावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे चौदा वर्षानंतर ती आता सर्वसामान्यपणे ऐकायला लागली आहे. १४ नोव्हेंबर रोजी देशभर बालक दिन साजरा केला जातो. याच महिन्यात तिला आवाजाची मिळालेली देणगी आयुष्यातील सर्वात मोठी ठरावी.
परभणी शहरातील मोंढा येथील रेश्मा बेग शेख नबी (वय १४) हिला लहानपणापासूनच ऐकू येत नव्हते. ती जस-जशी मोठी होऊ लागली तेव्हा ही बाब आई-वडिलांच्या लक्षात आले. रेश्माला काम सांगायचे असल्यास खूप मोठय़ा आवाजाने सांगावे लागत होते. रेश्मा बेगची आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. आई-वडिलांनी नांदेड व परभणी येथील खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखविले. परंतु, डॉक्टर औषधींनी बरे होईल, असे सांगत होते. नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी रेश्मा बेगच्या कानाचे एक्स-रे- काढला. त्यामध्ये उजव्या कानाच्या पडद्यामागे पाणी साचले होते. त्यामुळे तिला ऐकू येत नव्हते. तिच्या कानावर शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. रेश्मा बेगच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अनेकवेळा चकरा मारल्या. पण, डॉक्टर आज या उद्या या असे म्हणू लागले. त्यामुळे रेश्मा बेगच्या आई-वडिलांनी परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील कान, नाक व घसातज्ज्ञ डॉ. तेजस तांबुळे यांना दाखविले. त्यावेळी डॉ. तांबुळे यांनी कागदपत्रे तपासल्यानंतर रेश्मा बेगमच्या कानावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ऐकायला येऊ शकेल, असे सांगितले. त्यावेळी रेश्माच्या आई-वडिलांनी माझ्या मुलीच्या कानावर शस्त्रक्रिया करा, असे डॉ. तेजस तांबुळे यांना सांगितले. 
डॉ. तेजस तांबुळे यांनी ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात रेश्माच्या उजव्या कानावर डॉ. तांबुळे यांनी शस्त्रक्रिया केली. रेश्मा बेगच्या उजव्या कानाच्या पडद्याला विशिष्ट ठिकाणी छिद्र पाडून नळीद्वारे पडद्यामागचा पू व पाणी काढले. ही यशस्वी शस्त्रक्रिया दीड ते दोन तास करण्यात आली. त्यानंतर रेश्मा बेगला ऐकायला आल्यानंतर आई-वडिलाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 
जिल्हा रुग्णालयात सूक्ष्मदश्री यंत्राद्वारे कानाच्या किचकट शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्याने रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गोरगरिबांना याचा लाभ होऊ लागला आहे.
■ १२ ते १३ वर्षाच्या मुलांना टॉन्सीलच्या वारंवार होणार्‍या आजारामुळे कानाचा पडदा आतमध्ये ओढला जातो. त्याचा परिणाम कानाच्या पडद्यामागे पू व पाणी होणे, कान फुटणे यामुळे ऐकायला कमी येते. त्यामुळे पालकांनी वारंवार होणार्‍या घशाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये, तज्ज्ञ डॉक्टराकडे दाखवून निदान करून घ्यावे, असे कान, नाक व घसातज्ज्ञ तेजस तांबुळे यांनी सांगितले. 
 
डॉक्टर हळू बोला..
> रेश्मा बेगच्या उजव्या कानावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉ. तेजस तांबुळे यांनी रेश्माला ऐकायला येते का? असे विचारले असता डॉक्टर हळू बोला मला ऐकायला येतं, असे तिने सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनाही यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचा वेगळाच आनंद झाला. 
■ पूर्वी कानाच्या शस्त्रक्रिया म्हटले की रुग्ण घाबरत होते. कारण कानाच्या शस्त्रक्रिया बहुतांशी यशस्वी होत नव्हत्या. आता मात्र बाजारामध्ये अत्याधुनिक यंत्रे येत आहेत. परभणी येथील जिल्हा रुग्णालयात सूक्ष्मदश्री यंत्र उपलब्ध झाल्याने अवघड व किचकट शस्त्रक्रिया सोप्या व सुलभ झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांनी कानाच्या शस्त्रक्रियेला घाबरू नये, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी सांगितले.

Web Title: Fourteen years later she heard the voice ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.