‘त्या’ चौदा शिक्षकांची चौकशी पूर्ण
By Admin | Updated: April 11, 2017 00:15 IST2017-04-11T00:13:33+5:302017-04-11T00:15:25+5:30
जालना :भरतीचे आदेश नसतानाही जिल्ह्यात १४ शिक्षक भरती केल्याचा ठपका शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी ठेवल्याने नियुक्त केलेल्या या शिक्षकांची चौकशी करण्यात आली.

‘त्या’ चौदा शिक्षकांची चौकशी पूर्ण
जालना : शिक्षक भरतीची परवानगी नसताना २०१२ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी १४ शिक्षकांची खाजगी हायस्कूलवर नियुक्ती केली होती. भरतीचे आदेश नसतानाही जिल्ह्यात १४ शिक्षक भरती केल्याचा ठपका शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी ठेवल्याने नियुक्त केलेल्या या शिक्षकांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पूर्ण झाली आहे. संबंधितांवर शासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद आणि जालना येथील खाजगी संस्था आणि शिक्षण विभागाच्या संगनमताने खाजगी हायस्कूलमधील शिक्षकांच्या जागा भरण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या काळात संपूर्ण राज्यात शिक्षक भरतीवर बंदी होती. याला न जुमानता शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षकांची भरती करण्यात आली होती. जिल्ह्यात आधीच मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरीक्त ठरले होते. शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी १३ फेब्रुवारी २०१७ रोजी माध्यमिक शिक्षण विभागाला पत्र लिहून संबंधित शिक्षकांची चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांनी चौदा शिक्षकांची चौकशी पूर्ण करून त्यांची सुनावणी पूर्ण झाली असल्याचे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणावर शासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून असल्याचे शिक्षणाधिकारी तांगडे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)