चार वर्षे उलटली तरी तपास शून्य

By Admin | Updated: April 17, 2016 01:31 IST2016-04-17T01:12:02+5:302016-04-17T01:31:26+5:30

औरंगाबाद : अख्ख्या औरंगाबादला हादरवून सोडणाऱ्या श्रुती विजय भागवत (४६) यांच्या खुनाचे गूढ उलगडण्यात तब्बल चार वर्षांनंतरही पोलिसांना यश आले नाही.

Four years have passed since the investigation is zero | चार वर्षे उलटली तरी तपास शून्य

चार वर्षे उलटली तरी तपास शून्य


औरंगाबाद : अख्ख्या औरंगाबादला हादरवून सोडणाऱ्या श्रुती विजय भागवत (४६) यांच्या खुनाचे गूढ उलगडण्यात तब्बल चार वर्षांनंतरही पोलिसांना यश आले नाही. स्थानिक पोलीस अजूनही अंधारातच चाचपडत आहेत. अधिकृत नाही; पण अनधिकृतपणे पोलिसांनी या प्रकरणाची ‘फाईल’ जवळपास बंद केल्यासारखेच चित्र आहे. चार वर्षांमध्ये इंचभरही तपास पुढे न सरकल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा पोलिसांवरील विश्वास संपला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीआयडीकडे सोपविण्याची मागणी श्रुती भागवत यांचे भाऊ मुकुल करंदीकर यांनी केली आहे.
मुकुल करंदीकर (रा. अहमदाबाद, गुजरात) हे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेण्यासाठी औरंगाबादला आले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत त्यांची पोलीस आयुक्तांशी भेट झाली नव्हती. १८ एप्रिल २०१२ रोजी उल्कानगरीतील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये तळमजल्यातील फ्लॅट क्रमांक १ मध्ये पहाटे ३.५० वाजता धूर निघत असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक एम.एस. वराडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा श्रुती भागवत यांचा मृतदेह गादीत गुंडाळून पेटवून दिल्याचे स्पष्ट झाले होते. डोक्यात कुदळ, फावडे यासारख्या अवजाराने मारून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांनी पाच पथके तयार करून सर्व बाजूंनी तपास केला. दरोडा घालण्यासाठी आलेल्या चोरट्यांनीच खून केला असावा, असा

अंदाज पोलिसांनी बांधला; परंतु घरातून काहीही चोरीला गेले नाही, असे तपासात उघड झाले होते. नंतर जवळच्याच कोणीतरी हा खून केला असावा, अशी शंकाही पोलीस खाजगीत वर्तवित होते; परंतु पोलिसांचे हात शेवटपर्यंत रिकामेच राहिले. पुढे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. मात्र, त्यानंतरही पोलिसांना यश आले नाही.
सुरुवातीला दीड ते दोन महिने पोलीस श्रुती भागवत यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात होते. तपासातील कोणत्याही मुद्यांबाबत ते चर्चा करीत असत. मात्र, त्यानंतर अद्यापपर्यंत पोलिसांनी संपर्क साधला नाही. तपास सुरू आहे की नाही, याबाबत त्यांनी काहीही कळविले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास नेमका कोणाकडे आहे याचीही माहिती आमच्याकडे नाही, अशी खंत करंदीकर यांनी बोलून दाखविली.

Web Title: Four years have passed since the investigation is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.