चार वर्षे झोप अन् निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांचा धडाका !
By Admin | Updated: December 24, 2016 00:54 IST2016-12-24T00:52:46+5:302016-12-24T00:54:39+5:30
लातूर : चौदावा वित्त आयोग आणि नगरोत्थान योजना तसेच भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा कोट्यवधींचा निधी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या झोपकाढू धोरणामुळे परत गेला.

चार वर्षे झोप अन् निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांचा धडाका !
लातूर : चौदावा वित्त आयोग आणि नगरोत्थान योजना तसेच भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा कोट्यवधींचा निधी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या झोपकाढू धोरणामुळे परत गेला. सिटी बस योजनाही बारगळली अन् आता निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली उद्घाटन व भूमिपूजनाचा धूमधडाका मनपाने सुरू केला आहे.
महानगरपालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी विकास कामांकडे तसेच योजना राबविण्यास दुर्लक्ष केल्यामुळे चौदावा वित्त आयोग, नगरोत्थान योजना आणि सिटी बस योजनेचा ३० कोटींपेक्षा अधिक निधी परत गेला आहे. भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याची योजना ३२ कोटींची होती. या योजनेअंतर्गत तीनवेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु, उदासीन भूमिकेमुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी, योजनेचा निधी परत गेला आणि आता साडेचार वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांच्या नावाखाली उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धूमधडाका सुरू केला आहे. चार दिवसांपूर्वी नंदी स्टॉप परिसरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. तर काही दिवसांपूर्वी अशोक हॉटेल चौकाचे नामकरण केले. हायमास्ट दिवे बसविण्याचाही फार्स सुरू केला आहे. २६ डिसेंबर रोजी सम्राट चौक येथे समाज मंदिराचे भूमिपूजन आणि कबाले वाटपाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर बार्शी रोडवरील पाण्याची टाकी परिसरात विविध विकास कामांचा प्रारंभ २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. सूरत शाहवली दर्गाह इमारतीच्या सुशोभिकरण कामाचा प्रारंभ २७ डिसेंबर रोजी केला जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर चौक परिसरातील रेल्वे स्टेशन रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन २४ डिसेंबर रोजी होणार आहे. असे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे मनपा पदाधिकाऱ्यांनी आयोजित केले आहे. गेल्या साडेचार वर्षांचा लेखाजोखा घेतला तर झोपकाढू धोरण प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे होते. आता निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच झालेल्या स्थायीच्या बैठकीत ४७ विषयांना मंजुरी दिली. (प्रतिनिधी)