एकाच वेळी केले चार विश्वविक्रम
By Admin | Updated: April 6, 2016 01:29 IST2016-04-06T00:52:54+5:302016-04-06T01:29:19+5:30
औरंगाबाद : गौरव भंडारी या २६ वर्षीय युवकाने एकाच वेळी अंकगणितातील ४ विश्वविक्रम करून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा नवीन तुरा खोवला.

एकाच वेळी केले चार विश्वविक्रम
औरंगाबाद : ‘मानवी संगणक’ अशी ओळख असलेल्या गौरव भंडारी या २६ वर्षीय युवकाने एकाच वेळी अंकगणितातील ४ विश्वविक्रम करून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा नवीन तुरा खोवला.
मंगळवारी रात्री तापडिया नाट्यगृहात विश्वविक्रम बघण्यासाठी जमलेल्या शेकडो आबालवृद्धांना ‘सुपर ब्रेन’ काय असते, याचा साक्षात्कार घडला. गौरवने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर दोन विश्वविक्रम मोडले, तर २ नवीन विश्वविक्रम स्थापित केले. या सोहळ्याचे साक्षीदार ठरले ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, सांजवार्ताचे संपादक दिलीप चितलांगे, नंदकुमार घोडेले. १ ते १०० पर्यंतच्या संख्यांचे घन करण्याचा हिंमत भारद्वाज यांनी यापूर्वी केलेला २ मिनिट ४७ सेकंदांचा विक्रम मोडीत काढत गौरवने अवघ्या २ मिनिट १९ सेकंदांचा नवीन विक्रम स्थापित केला. ६ अंकी संख्येच्या गुणाकाराचा दुसरा विक्रम अवघ्या १ मिनिट १८ सेकंद १२ मायक्रो सेकंदात पूर्ण केला. यापूर्वीचा विक्रम बी. पवन साई यांच्या नावे १ मिनिट ५० सेकंदांचा होता. या विक्रमाला गौरवने पाठीमागे टाकले. अन्य दोन विक्रम गौरवने नव्याने स्थापन केले. यात त्याने दोनची दुप्पट चार व आठची दुप्पट सोळा, अशी तेहतीस अंकांपर्यंत दुप्पट करीत नवीन विश्वविक्रम केला. उल्लेखनीय म्हणजे संगणकावर ही प्रक्रिया फक्त ३२ अंकांपर्यंतच
येते.
त्याने अवघ्या ६ मिनिट ३७ सेकंद ७५ मायक्रो सेकंदात हा विक्रम नोंदविला. चौथा विक्रम होता कोणत्याही दोन अंकी संख्येचे कमीत कमी ९ पाढे बोलून दाखवायचे होते. अवघ्या ५७ सेकंद ३७ मायक्रो सेकंदात त्याने हा नवा विक्रम स्थापित केला. मात्र, त्यास ६० अंकी संख्येचे बेरीज डावीकडून उजवीकडे कोणतेही हाच्चे न घेता ६० सेकंदापूर्वी सोडवायचे होते. मात्र, तीन प्रयत्नात त्यास हा पाचवा विश्वविक्रम करता आला नाही. यावेळी परीक्षक म्हणून डॉ. प्रवीण सोमय्या, पुरुषोत्तम शर्मा व आर.जी. दरख यांनी काम पाहिले. यावेळी गौरवचे वडील विजयकुमार भंडारी, अॅड. आर. डी. बाहेती आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विशाखा नांदगावकर यांनी केले.
‘सुपर ब्रेन’ला आबालवृद्धांचा सलाम
गौरव भंडारी याने एकाच वेळी अंकगणितातील ४ विश्वविक्रम केल्याचे युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे मोहंमद परवेज यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, सांजवार्ताचे संपादक दिलीप चितलांगे व नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते गौरवला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी नाट्यगृहात जमलेल्या सर्व आबालवृद्धांनी उभे राहून गौरवच्या ‘सुपर ब्रेन’ला सलाम केला.
भविष्यात स्वत:चे विक्रम मोडण्याची शुभेच्छा
गौरव भंडारीने विश्वविक्रम केल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, गौरवने आपल्या अफाट बुद्धिमत्तेने आज संगणकालाही हरविले. औरंगाबाद शहर अनेक गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे; पण आज गौरवने एकाच वेळी अंकगणितातील ४ विश्वविक्रम नोंदवीत जगात शहराला सन्मानित केले.
आज आम्ही ताठमानेने जगाला सांगू शकतो की, जगातील सुपर ब्रेन पॉवर गौरव भंडारी हा आमच्या औरंगाबादेत, भवानीनगरातील ८ नंबर गल्लीत राहतो. भविष्यात स्वत:चे विक्रम मोडीत काढ व नवनवीन विक्रम स्थापित कर, अशा शुभेच्छा दर्डा यांनी दिल्या.