छत्रपती संभाजीनगर : पतीच्या निधनानंतर वारसा हक्काने हस्तांतरीत झालेल्या २ अलिशान गाड्या सासरच्यांनी परस्पर स्वत:च्या नावावर केल्या. यासाठी आरटीओ व घाटीच्या डॉक्टरांकडून वाहनांची कागदपत्रे व कोविड प्रमाणपत्र बनावट तयार केले. विवाहितेने माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती मागवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी महिलेच्या सासरच्यांसह आरटीओ अधिकारी व घाटीच्या डॉक्टरांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
स्वप्निल विजयकुमार गंगवाल, विजयकुमार हंसलाल गंगवाल (दोघेही रा. बाणेर, पुणे), आरटीओ एजंट मोहम्मद सईद अब्दुल रज्जाक, डॉ. सुरेश राऊतसह आरटीओ कार्यालयातील ३ अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४३ वर्षीय विद्या निखिलकुमार गंगवाल (रा. ठाणे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. जानेवारी २००८ मध्ये त्यांचा निखिलकुमार यांच्यासोबत विवाह झाला होता. डिसेंबर २०१७ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर उद्भवलेल्या कौटुंबीक वादामुळे विद्या ठाण्याला भावाकडे राहण्यास गेल्या. पतीच्या निधनानंतर वारसा हक्काने त्यांना इनोव्हा व इटियोस लीवा या गाड्या हस्तांतरीत झाल्या होत्या. मात्र, दीर स्वप्निल व सासरे विजयकुमार यांनी त्या त्यांच्याकडे ठेवल्या होत्या. २०२३ मध्ये मात्र दोन्ही गाड्या त्यांच्या नावावर झाल्याची बाब विद्या यांच्या निदर्शनास आली.
माहितीच्या अधिकारात बाब निष्पन्नमाहितीच्या अधिकारात इनोव्हा गाडी हस्तांतरित करताना बनावट कागदपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले. स्वप्निलने विद्या यांच्या जागी दुसरीच महिला उभी करून अंगठ्याचे ठसे घेतले. एजंट मोहम्मद सईदने ही प्रक्रिया केली. आरटीओच्या ३ अधिकाऱ्यांनी याची शहानिशा न करताच परवानगी दिली. त्यादरम्यान घाटीचे डॉ. राऊत यांच्या मदतीने कोविड लसीचे खोटे प्रमाणपत्र तयार करून त्यात विद्या यांना पुरुष दाखवत आरटीओत सादर केले गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. विद्या यांनी याबाबत वेदांतनगरच्या निरीक्षक प्रविणा यादव यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.