मौजमजेसाठी महिलांची पर्स हिसकावणारे चार चोरटे अटकेत

By Admin | Updated: July 9, 2017 00:41 IST2017-07-09T00:36:10+5:302017-07-09T00:41:53+5:30

औरंगाबाद : मौजमजा करण्यासाठी महिलांची पर्स आणि मोबाइल हिसकावणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायबर क्राइम सेलच्या मदतीने अटक केली.

Four thieves hanging out of women's purse for fun | मौजमजेसाठी महिलांची पर्स हिसकावणारे चार चोरटे अटकेत

मौजमजेसाठी महिलांची पर्स हिसकावणारे चार चोरटे अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मौजमजा करण्यासाठी महिलांची पर्स आणि मोबाइल हिसकावणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायबर क्राइम सेलच्या मदतीने अटक केली. या चोरट्यांनी तापडियानगर आणि दशमेशनगर भागात पादचारी महिलांची पर्स आणि मोबाइल हिसकावून नेल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीचे चार मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड, मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.
गजानन डिगंबर जानोळे (२७, रा. राजनगर, मुकुंदवाडी), अनिकेत कचरू विधाते (१८, रा. मुकुंदनगर), राहुल बाळू मिसाळ (रा. मुकुंदनगर) आणि अन्य एका विधिसंघर्षग्रस्त मुलाचा आरोपीत समावेश आहे. गत महिन्यात दोन पादचारी महिलांची पर्स हिसकावून नेण्यात आल्याची घटना घडली. या घटनांच्या अनुषंगाने सायबर क्राइम सेलचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि अधिकाऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने तपास केला. तेव्हा दोन्ही घटनांच्या वेळी एक मोबाइलधारक तेथे उपस्थित असल्याचे आढळले. हा मोबाइलधारक मुकुंदवाडी परिसरात असल्याची पक्की माहिती त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, साईनाथ महाडिक, फारुख देशमुख, संजय धुमाळ, ओमप्रकाश बनकर, संजय जाधव, चालक ज्ञानेश्वर पवार यांनी तपास करून आरोपी गजानन जानोळे यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने दीड महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलासह तापडियानगर भागात पादचारी महिलेची पर्स हिसकावून दुचाकीने पळून गेल्याची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील अठरा हजारांचे दोन महागडे मोबाईल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. त्यानंतर २ जुलै रोजी आरोपी अनिकेत, राहुल यांच्या मदतीने दशमेशनगरात महिलेची पर्स हिसकावल्याचे सांगितले. महिलेच्या पर्समधील २१ हजार ४०० रुपये किमतीचे दोन मोबाईल, दोन्ही गुन्ह्यात वापरलेली मोपेड व मोटारसायकल जप्त केली. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
अपहरणाच्या संशयावरून १४ वर्षीय मुलगा ताब्यात
बालकाचे अपहरण केल्याच्या संशयावरून १४ वर्षीय मुलाला (विधिसंघर्षग्रस्त) मारहाण करून जिन्सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री बायजीपुऱ्यात घडली. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत दाखल केले.
ईदच्या दरम्यान एका बालकाचे अपहरण करून त्यास हिमायत बाग परिसरात नेऊन सोडण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंद आहे. शनिवारी सायंकाळीही एका मुलाचे अपहरण केल्याच्या संशयावरून पोलिसांनी अल्पवयीन मुलास पकडून त्यास मारहाण केली. यानंतर ते त्याला सोबत घेऊन ठाण्यात गेले. त्याला बालसुधारगृहात दाखल केले जाईल.

Web Title: Four thieves hanging out of women's purse for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.