पोलिसांनी केले चार दरोडेखोर जेरबंद
By Admin | Updated: May 11, 2016 00:49 IST2016-05-11T00:28:30+5:302016-05-11T00:49:57+5:30
पाचोड : पाचोड-पैठण रस्त्यावर नानेगाव दावरवाडी शिवारात रविवारी (दि.८) रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ४ दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखा व पाचोड पोलिसांनी

पोलिसांनी केले चार दरोडेखोर जेरबंद
पाचोड : पाचोड-पैठण रस्त्यावर नानेगाव दावरवाडी शिवारात रविवारी (दि.८) रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ४ दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखा व पाचोड पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. अंधाराचा फायदा घेत तीन दरोडेखोर मात्र पळून गेले.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कांचनकुमार चाटे, फौजदार जाधव, पठाण, जमादार कोल्हे, पोलीस नाईक वारे, गायकवाड, जावेद, झिया, फौजदार डी.डी. मगरे, जमादार गायकवाड, देसाई, धांडे, वाघमारे व पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे व त्यांचे सहकारी यांचे पथक तयार केले आहे.
पथक तपासासाठी पाचोड, विहामांडवा शिवारात रविवारी रात्री गस्तीवर होते. एका खबऱ्याने माहिती दिली की, दावरवाडी शिवारात नानेगाव फाट्याजवळ दरोडेखोर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनावर दरोडा टाकण्याच्या तयारीत बसले आहेत. त्यावरून पोलिसांनी आपला मोर्चा दावरवाडी-नानेगाव शिवाराकडे वळविला. तेथे सात ते आठ दरोडेखोर हे एका टपरीच्या पाठीमागे दबा धरून बसले होते.
चाहूल लागताच दरोडेखोर पळू लागले. यानंतर पोलिसांनी पाठलाग करून अभिमान शिवदास पवार (२९), नितीन ऊर्फ नित्या शिवदास पवार (२६, दोघे रा. वडजी, ता. पैठण), मंग्या भुऱ्या भोसले (३४ रा. रहाटगाव, तालुका पैठण), सतीश आसाराम गवळी (२६ रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) यांना पोलिसांनी पकडले. तिघे पळून गेले. त्यात बाबुराव शाबासा चव्हाण, चरण कुंडलिक काळे (रा. दोघेही सालवडगाव, ता. पैठण), तर गणेश वरज्या भोसले (रा. थेरगाव, ता. पैठण) यांचा समावेश आहे. या दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्याचे साहित्य, मोबाईल पोलिसांनी जप्त केले. फौजदार पी.डी.भारती यांच्या फिर्यादीवरून वरील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे करीत आहेत.