साडेचार क्विंटल बटाटे विकले; हाती १७२ रूपये पडले !
By Admin | Updated: April 15, 2015 00:40 IST2015-04-15T00:35:32+5:302015-04-15T00:40:45+5:30
कळंब : अत्यल्प पावसावर ईटकूर येथील शेतकऱ्याने मोठ्या हिम्मतीने बटाट्याची लागवड केली. स्व:कष्टाने ही शेती फुलविली. बाजारपेठेत बटाट्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती.

साडेचार क्विंटल बटाटे विकले; हाती १७२ रूपये पडले !
कळंब : अत्यल्प पावसावर ईटकूर येथील शेतकऱ्याने मोठ्या हिम्मतीने बटाट्याची लागवड केली. स्व:कष्टाने ही शेती फुलविली. बाजारपेठेत बटाट्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांचा भ्रमनिरास झाला. बार्शीच्या बाजारपेठेत साडेचार क्विंटल बाटाटे घेऊन गेले असता हमाली, कमिशन अन् खर्च वजा जाता अवघे १७२ रूपये उरले.
ईटकूर येथील शेतकरी राजाभाऊ जोगदंड या शेतकऱ्यांने अल्पशा पाण्यावर इतर पिके तग धरणार नाहीत, म्हणून शेतीमध्ये बटाट्याची लागवड केली. जे काही पाणी उपलब्ध होते, त्यावर बटाट्याची शेती चांगली फुलली. बार्शी येथे चांगला दर मिळत असल्याचे कळाल्यानंतर जोगदंड यांनी जवळपास साडेचार क्विंटल बटाटे बार्शीच्या बाजारपेठेत नेले. परंतु, या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. अत्यल्प दर मिळाल्याने वाहतूक, हमाली, कमिशन हा सर्व खर्च वजा जाता जोगदंड यांच्या हाती अवघे १७२ रूपये उरले. गवाचा मार्ग धरताना त्यांचे डोळे पाणावले.
टोमॅटोचा 'लालचिखल'
अनेक शेतकरी नवप्रयोग म्हणून टोमॅटोची लागवड करतात. यावर्षी टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्तरार्धात चांगलेच नुकसान झाले. महिनाभरापासून टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. अनेक शेतकऱ्यांनी तर विकण्यापेक्षा शेतात टाकून दिली आहेत. कॅरेटला निच्चांकी दर मिळाल्याचे उत्पादक शेतकरी सांगतात. त्यातच गारपिटीने तोडणीस आलेल्या मालाचा खच पडल्याने शेतकऱ्यांना लाल चिखलाची अनुभूती येत होती. (वार्ताहर)
ईटकूर येथीलच विजय माने यांनी मोठ्या अपेक्षेने एक एकर कोबीचे पीक घेतले होते. अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेल्या या पिकाची कृषी विभागाकडूनही पहाणी करण्यात आली होती. परंतु, पीक हाती आल्यानंतर मिळालेल्या दराने चक्क त्यांची थट्टाच केली. कळंब येथील मंडईत तीस ते चाळीस किलो वजनाचे वीस पोते कोबी त्यांनी विक्रीस पाठवली. याची संपूर्ण पट्टी १ हजार ८६० रुपये झाली. यातून वाहतूक ४००, तोडणी ४००, रिकामा बारदाना २००, कमिशन १८६ आणि हमाली ६० रूपये असे एकूण १ हजार २४० रुपये खर्च वजा जाता निव्वळ ६२० रुपये हाती पडले. म्हणजे कोबीला प्रती किलो दोन रुपये दर मिळणेही दुरापास्त झाले. ं