पुलावरून गाडी कोसळून चार जण गंभीर
By | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:54+5:302020-11-28T04:07:54+5:30
याबाबत माहिती अशी की, देवगाव (ता. पारोळा) येथील पाटील कुटुंबातील सहा जण कारने सोयगाव - बनोटी रस्त्याने सिल्लोड ...

पुलावरून गाडी कोसळून चार जण गंभीर
याबाबत माहिती अशी की, देवगाव (ता. पारोळा) येथील पाटील कुटुंबातील सहा जण कारने सोयगाव - बनोटी रस्त्याने सिल्लोड येथील नातेवाईकाकडे हळदीच्या कार्यक्रमाला चालले होते. वरठाण येथील हिवरा नदीच्या पुलाजवळ गाडी येताच गाडीचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले. यामुळे नियंत्रण सुटून गाडी पुलावरून थेट नदीपात्रात २० फूट खाली कोसळली. या अपघातात पृथ्वीराज गंगाराम पाटील (३६), दामिनी पृथ्वीराज पाटील (३२), मनीष धनराज पाटील (३५), अमृता मनीष पाटील (२८) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जोराच्या आवाजाने रस्त्यावरून जाणारे लोक तसेच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच बनोटी दुरक्षेत्राचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्वप्रथम त्यांनी वाहतूक कोंडी फोडून जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी बनोटी पोलीस चौकीत नोंद घेण्यात आली आहे.
चौकट
दोन बालकांना साधा ओरखडाही नाही
या अपघातात पाटील कुटुंबीयांमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या गाडीतील चार वर्षीय शिवांशू मनीष पाटील व दोन वर्षीय प्रियांशी मनीष पाटील या दोन बालकांच्या शरीरावर साधा ओरखडाही उमटला नाही. अपघातानंतर गाडीची झालेली अवस्था पाहून उपस्थित नागरिकही या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
चौकट
कठडे नसल्याने अपघातास निमंत्रण
हिवरा नदीच्या पुलाला संरक्षक कठडे असते तर कार पुलाच्या खाली गेली नसती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी यावेळी दिली. सोयगाव तालुक्यातील अनेक पुलांना कठडे नसल्याने तेथेही अपघातांना निमंत्रण मिळत आहे. प्रशासनाने पुलांना संरक्षक कठडे उभारावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
छायाचित्र ओळ : वरठाण येथे अपघातग्रस्त झालेली कार.