भीषण अपघातात चार भाविक ठार
By Admin | Updated: June 30, 2014 00:36 IST2014-06-30T00:24:57+5:302014-06-30T00:36:59+5:30
कडा: तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कारला ट्रकने समोरासमोर जोराची धडक दिली़ या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले़

भीषण अपघातात चार भाविक ठार
कडा: तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कारला ट्रकने समोरासमोर जोराची धडक दिली़ या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले़ ही घटना कड्याजवळ शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडली़ मृतांत नाशिक जिल्ह्यातील वणी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांचा समावेश आहे़
सुरेश वसंतराव थोरात (वय ३९), वणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच संजय यशवंत थोरात (वय ४५), शिवाजी केशव थोरात (वय ४२ तिघे रा़ वणीकसबे ता़ दिंडोरी जि़ नाशिक), साहेबराव रामचंद्र देशमुख (वय ४९ रा़ लखमापूर ता़ दिंडोरी जि़ नाशिक) अशी मृतांची नावे आहेत़ ते सर्व जण कार क्ऱ (एम़ एच़ १५ डीसी- ९४६१) मधून अहमदनगरहून बीडमार्गे तुळजापूरला दर्शनासाठी जात होते़ त्यांची कार कड्याजवळ आली तेव्हा अहमदनगरच्या दिशेने लाकडे घेऊन निघोलल्या ट्रक क्ऱ (एम़ एच़ ०४ एफयू- १२०५) ने समोरासमोर धडक दिली़ या अपघातात कारचा चक्काचूर झाला़ गंभीर मार लागून चौघेही जागीच गतप्राण झाले़ अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे़ कडा चौकी पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेले़ रविवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले़
आष्टी ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहायक निरीक्षक शेख सलीम करत आहेत़
वणी कसबेवर शोककळा
अपघाताची माहिती कळाल्यावर वणी कसबे येथील ग्रामस्थ कड्यात दाखल झाले़
सुरेश थोरात, संजय थोरात व शिवाजी थोरात यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ एकाच अपघातात तिघे जण गतप्राण झाल्याने गाव शोकसागरात बुडाले आहे़ (वार्ताहर)
अवैध लाकूड वाहतुकीच्या ट्रकने घेतले बळी !
कडा परिसरातून रात्री-अपरात्री अवैध लाकूड वाहतूक केली जाते़ ज्या ट्रकने भाविकांच्या कारला उडविले़ त्याट्रकचालकाकडेही रितसर परवाना नव्हता अशी पोलीसांची माहिती आहे़ या ट्रकने चार भाविकांचा बळी घेतला़ अवैध लाकूड वाहतूक ही पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरु असल्याची चर्चा होती़