विटा गावात डेंग्यूचे चार रुग्ण आढळले
By Admin | Updated: September 2, 2014 01:54 IST2014-09-02T01:31:50+5:302014-09-02T01:54:38+5:30
कन्नड : तालुक्यातील विटा गावातील चार रुग्णांच्या रक्त तपासणी अहवालात डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे,

विटा गावात डेंग्यूचे चार रुग्ण आढळले
कन्नड : तालुक्यातील विटा गावातील चार रुग्णांच्या रक्त तपासणी अहवालात डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे, तर याच गावातील काही रुग्णांवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, काही रुग्ण डेंग्यूसदृश रोगाने आजारी असल्याचा अहवाल तलाठी ए. एल. महाजन यांनी तहसील कार्यालयास दिला आहे.
माजी उपसरपंच अर्जुन कोरडे यांनी सांगितले की, गावातील सुमारे २५ जण डेंग्यूसदृश तापाने आजारी आहेत. १० ते १२ जण औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत, तर काही जण गावातच आहेत व औराळा प्रा. आ. केंद्रात उपचार घेत आहेत. डेंग्यूसदृश तापाच्या आजारांमुळे गावात भीतिदायक वातावरण आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विडेकर यांनी सांगितले की, विटा गावात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याने गावात सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्हा साथरोग अधिकारी यांनीही भेट दिली आहे. औराळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले, चार रुग्णांच्या रक्त तपासणी अहवालात डेंग्यू पॉझिटिव्ह आहे. गावात सर्वेक्षण सुरू असून, तीन कर्मचारी गावात तळ ठोकून आहेत. दोनदा धूरफवारणी करण्यात आली आहे. मोठा पाऊस नसल्याने दलदल वाढलेली आहे. डबक्यांमध्ये पाणी साचलेले आहे. या पाण्यामध्ये अॅबेट टाकण्यात आले आहे. शिरोडी येथेही डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तेथेही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.