जिल्ह्यातील चार पंचायत समित्या होणार चकाचक
By Admin | Updated: August 7, 2014 02:05 IST2014-08-07T01:00:54+5:302014-08-07T02:05:27+5:30
जालना: जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड व जाफराबाद या चार पंचायत समितीच्या इमारतीअंतर्गत फर्निचरसह सुशोभिकरणाच्या कामांना आता मुहूर्त सापडला आहे.

जिल्ह्यातील चार पंचायत समित्या होणार चकाचक
जिल्ह्यातील चार पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारती अंतर्गत फर्निचर व्यवस्था व सुशोभिकरणाच्या कामांना मुहूर्त लागावा म्हणून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा मोठा पाठपुरावा केला. अखेर उशिरा का होईना या कामांना राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविला. त्या पाठोपाठ या कामांसाठी ग्रामविकास मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता बहाल केली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांनी कामाच्या अंदाजपत्रकासह व तांत्रिक मान्यता बहाल केली.
मंठा येथील समितीच्या इमारतीत फर्निचर सुशोभिकरणाकरिता ४९ लाख ७६ हजार २८४ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अंबड येथील कामांकरिता ४९ लाख ९८ हजार ५०० रुपये, जाफराबाद येथील कामांकरिता ४९ लाख ९७ हजार ५५८ व परतूर येथील कामांकरिता ४९ लाख ९७ हजार ७८ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या चारही पंचायत समितीच्या कामांच्या निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहेत. या कामांसाठी आॅनलाईनद्वारे, एकदा नव्हे तीनदा बोलविण्यात आल्या. त्यास अल्प प्रतिसाद मिळाला. अखेर तिसऱ्यांदा बोलविलेल्या निविदांतून या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी निविदांचे दरपत्रक निश्चित केले असून, त्यामुळे या कामांना लवकरच मुहूर्त लागेल अशी चिन्हे आहेत. दरम्यान या चारही पंचायत समितीत फर्निचर व साहित्याअभावी अनेक अडचणी उद्भवत होत्या. (प्रतिनिधी)भोकरदन तालुक्यातील मौजे पिंपळगाव रेणुकाई व मौजे लेहा येथील ग्रामपंचायत कार्यालय व चावडी इमारत जीर्ण झाली असून, ती मोडकळीस आल्याने ती इमारत पाडली जाणार आहे. संंबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी या संदर्भात २५ जुलै रोजी जिल्हा परिषेस प्रस्ताव सादर केला होता. लगेच बांधकामच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. अधीक्षक अभियंत्यांची आता ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ती इमारत पाडली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.