आणखी चार जण ताब्यात

By Admin | Updated: July 13, 2014 00:22 IST2014-07-13T00:03:56+5:302014-07-13T00:22:21+5:30

पाथरी : पीएमडी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातल्यानंतर या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या मुख्य दोन आरोपींकडून आता माहिती बाहेर येत आहे.

Four more people were arrested | आणखी चार जण ताब्यात

आणखी चार जण ताब्यात

पाथरी : पीएमडी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातल्यानंतर या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या मुख्य दोन आरोपींकडून आता माहिती बाहेर येत आहे. १२ जुलै रोजी पीएमडी कंपनीशी संलग्न असणाऱ्या चार संशयित आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या तपासी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मारोती शिफ्ट चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत.
तालुक्यातील खेडुळा येथील मुंजाजी डुकरे याने पीएमडी मल्टी सर्व्हिस नावाची कंपनी स्थापन करून त्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना मागील दोन वर्षांत करोडो रुपयांचा गंडा घातला. कंपनी स्थापन झाल्यानंतर दुप्पट, तिप्पट आणि पाच पट रक्कमेचे आमिष दाखवित जिल्ह्यासह महाराष्ट्रात या कंपनीने एजंटामार्फत मजबूत जाळे तयार केले. सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना दुप्पट आणि तीनपट रक्कम परत केली. यामुळे रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक या कंपनीमध्ये केली. कंपनीकडून परतावा मिळत नसल्याने मागील तीन महिन्यांपासून गुंतवणूकदारांनी कंपनीतून गुंतविलेले पैसे परत काढण्यासाठी रीघ लावली. मुंजाजी डुकरे याने दोन महिने गुंतवणूकादारांना खोटे आश्वासन देऊन झुलवत ठेवले. पैसे मागणाऱ्यांचा तगादा वाढल्याने पीएमडी कंपनीने पाथरीचे कार्यालय बंद करून पाथरीतून पोबारा केला.
२५ जून रोजी या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यामध्ये एका गुंतवणूकदाराने लेखी तक्रार केली. या तक्रारीवरून मुंजाजी डुकरे याच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. तत्पूर्वी मुंजाजी डुकरे हा राज्याबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदार ग्राहक मुंजाजी डुकरे याच्या मालमत्तेवर दावा सांगण्यासाठी पाथरीत दाखल झाले. परंतु सर्वच चंबूचवळा गुंडाळून घेतलेल्या डुकरेने पाठीमागे काहीच सोडले नव्हते. दरम्यानच्या काळात नाथरा येथील दोन संचालकांना पोलिसांनी अटक केली व त्यांची जामिनावर मुक्तता झाली.
५ जुलै रोजी मुंजाजी डुकरे याचा साथीदार कृष्णा आबूज यास सोबत घेऊन पाथरी पोलिसांना शरण आला आणि या प्रकरणाचा तपास परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला.
न्यायालयाने या दोन्ही आरोपींना १९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसाच्या ताब्यात हे दोन्ही आरोपी असल्याने चौकशी दरम्यान अनेकांची नावे आता पुढे येऊ लागली आहेत. तीन दिवसांपूर्वी तीन संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी एक मोटारगाडी जप्त केली होती.
१२ जुलै रोजी या प्रकरणात संशयित म्हणून पोलिसांनी आणखी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)
संशयितांचा तपास सुरू
पीएमडी कंपनीचा मुख्य मालक मुंजाजी डुकरे याच्याकडून पोलिस अधिक तपास करीत असल्याने गुंतवणूकदाराच्या पैशांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून १२ जुलै रोजी पोलिसांनी भागवत मुंजाजी शेळके, नारायण छत्रभुज वाघमारे (रा. पाथरी), पांडुरंग रामभाऊ लांडगे (रा. जालना), नागनाथ महादेव मोरे (रा. धारूर) या चार संशयित आरोपींना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांंनी दिली. दरम्यान शेळके यांच्याकडून मारोती शिफ्ट एम.एच. २२ आर. ७१९९, नारायण वाघमारे याच्याकडून मारोती शिफ्ट एम.एच. ४४- जी.७७७४ या दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
चौकशीअंती कारवाई
अटक केलेल्या आरोपींनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या चार संशयित आरोपींच्या बँक खात्याची व इतर व्यवहाराची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच रितसर कारवाई केली जाणार असल्याची माहिती विवेक मुगळीकर यांनी दिली.
सहा गाड्या जप्त
पीएमडीप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात चारचाकी सहा गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या गाड्यांच्या रांगा पाथरी पोलिस ठाण्याच्या आवारामध्ये लागल्या आहेत.

Web Title: Four more people were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.