साडेचारशे कुटुंबांना मिळणार महेश सेवा निधीचा आधार
By Admin | Updated: April 3, 2017 22:39 IST2017-04-03T22:33:55+5:302017-04-03T22:39:14+5:30
उस्मानाबाद महाराष्ट्र महेश सेवा निधी ट्रस्ट कार्यरत असून, या ट्रस्टमार्फत दरमहा अडीचशे कुटुंबांना मदतीचा आधार दिला जात आहे.

साडेचारशे कुटुंबांना मिळणार महेश सेवा निधीचा आधार
उस्मानाबाद : समाजसेवा, चळवळ म्हणजे तरी काय? आपल्या सानिध्यात, संपर्कात येणाऱ्या गरजूंना मदतीचा हात देवून त्यांचे जगणे सुलभ करणे हीच खरी सामाजिक सेवा. याच हेतुने महाराष्ट्र महेश सेवा निधी ट्रस्ट कार्यरत असून, या ट्रस्टमार्फत दरमहा अडीचशे कुटुंबांना मदतीचा आधार दिला जात आहे. या ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या काळात हे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आला असून, लवकरच साडेचारशे कुटुंबांना मदत देण्यात येणार आहे.
माहेश्वरी समाजातील आर्थिक दुर्बलांना सहाय्य करण्याच्या हेतुने ओंकारनाथ मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली १९९१ ला महाराष्ट्र महेश सेवा निधीची स्थापना करण्यात येऊन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये या ट्रस्टमार्फत काम सुरू करण्यात आले. मारवाडी समाज तसा उद्योगात अग्रेसर आहेत. मात्र त्यानंतरही काही कुटुंबांची आर्थिक स्थिती दयनीय असल्याचे समोर आल्यानंतर या गरजूंना सामाजिक भावनेने मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्यस्थितीत या ट्रस्टअंतर्गत कोलकत्त्याच्या मातोश्री प्रकोष्टतर्फे १९० जणांना दरमहा एक हजार रुपयांचा निधी मनिआॅर्डरद्वारे पाठविण्यात येतो, तर चेन्नई येथील बन्सीलाल राठी यांच्यामार्फत ४० जणांना मदत देण्यात येते. या ट्रस्टकडे सध्या संग्रह निधी ७० लाखांचा जमा असून, त्यातून येणाऱ्या व्याजापोटीच्या ६४ हजार रुपयांच्या रकमेतून ही मदत केली जाते; मात्र मदतीची रक्कम जास्त आणि उपलब्ध पैसे कमी अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर महेश सेवा निधीच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर येथील मालपाणी परिवाराशी संपर्क साधून या उपक्रमाबाबत माहिती दिली. महेश सेवा निधीचा हा उपक्रम मालपाणी यांना भावल्यानंतर त्यांनी हा उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी १ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. याबरोबरच त्यांनी महेश सेवा निधीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही २२ जिल्ह्यात समाजबांधवांकडे जावून निधी गोळा करा, तुम्ही जेवढा निधी गोळा कराल तेवढा निधी मी तुम्हाला देईन असा शब्द दिला. त्यामुळे या उपक्रमाच्या विस्तारासाठी पदाधिकारी जोमाने कामाला लागले आणि मागील काही दिवसांत त्यांनी राज्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला. महेश सेवा निधीचे अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी (उस्मानाबाद), हिरालाल मालू (पुणे), सत्यनारायण लाहोटी (बीड), नंदलाल मिणियार (नगर), अशोक बंग (लातूर), मधुसुदन गांधी (डोंबिवली), सतीश चरखा (जळगाव) संजय मंत्री (उस्मानाबाद) आदींच्या या दौऱ्याला समाजबांधवांतून चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे २ कोटी ५५ लाखांची रक्कम मिळण्याचे आश्वासन प्राप्त झाले असून, ७० लाखांचा हा ट्रस्ट येत्या ७ एप्रिल रोजी ७ कोटींवर पोहोचला आहे. यातून राज्यातील माहेश्वरी समाजातील ४५० गरजू कुटुंबांना दरमहिना १५०० ते १८०० रुपये रक्कम देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी ट्रस्टने राज्यभरातून १२ कोटींचा निधी उभारण्याचे नियोजन आहे. केवळ शासकीय योजनांवर विसंबून न राहता दानशुरांनी समाजातीलच गरजंूच्या मदतीसाठी घेतलेल्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)