चार घरांवर कोसळले सेंट्रिंग
By Admin | Updated: January 23, 2015 00:58 IST2015-01-23T00:52:10+5:302015-01-23T00:58:44+5:30
औरंगाबाद : रमानगरमधील इमारतीचे सेंट्रिंग कोसळून मागच्या चार खोल्यांवर पडल्याने पत्र्यांचे छत व भिंती पडल्या. यात चार जण जखमी झाले.

चार घरांवर कोसळले सेंट्रिंग
औरंगाबाद : रमानगरमधील इमारतीचे सेंट्रिंग कोसळून मागच्या चार खोल्यांवर पडल्याने पत्र्यांचे छत व भिंती पडल्या. यात चार जण जखमी झाले. वर्षभरापूर्वीच येथील रमानगरमधील मगरे परिवाराच्या घराला आग लागली होती. त्यांनी पै-पै जमा करून तिथे नवीन खोल्या बांधल्या. आठ दिवसांनंतर ते राहण्यासाठी येणार होते. मात्र, त्याआधीच छत कोसळले.
दुर्घटना काही आमचा पिच्छा सोडेना, असे म्हणत रावसाहेब मगरे यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मगरे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस स्टेट बँक कॉलनी आहे. येथे पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सेंट्रिंग लावताना पाठीमागील घरांवर बांधकाम साहित्य पडू नये यासाठी संबंधित बिल्डरने कोणतीच दक्षता घेतली नव्हती.
इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम सुरू होते. गुरुवारी ४.३० वाजेच्या सुमारास अचानक सेंट्रिंग कोसळले. ते बाजूच्या घरांवर जाऊन आदळले. यात चार घरांवरील पत्र्यांचे छत व भिंती पडल्या.
यातील दोन खोल्या या लक्ष्मण मगरे व रावसाहेब मगरे यांच्या आहेत. त्यांनी तिथे नवीन खोल्या बांधल्या. या खोल्यांना रंग देण्याचे काम सुरू होते. जोराचा आवाज ऐकून रंग देणारे घरातून बाहेर पळाले आणि छत पडले. यात दिनेश गायकवाड, रावसाहेब मगरे, अरुणा मगरे, प्रेम दाभाडे हे जखमी झाले. त्यांना घाटीत नेण्यात आले. याशिवाय नितीन खोतकर व भिकन पवार यांच्या दोन खोल्यांचे छत व भिंती पडल्या. येथे विनोद शर्मा हे जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर येथे नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. उस्मानपुरा ठाण्याच्या पोलिसांनी येऊन माहिती घेतली.
लक्ष्मण मगरे यांनी आरोप केला की, आमच्या घराच्या मागील बाजूस स्टेट बँक कॉलनीत बिल्डरने ५ मजली इमारत बांधली; पण बांधकाम करताना आसपासच्या रहिवाशांची कोणतीच काळजी घेतली नाही.
४बांधकामाचे साहित्य घरावर पडू नये म्हणून नेटची जाळी बसविणे अपेक्षित होते; पण वारंवार सांगूनही बिल्डरने दुर्लक्ष केले. संबंधित बिल्डरने झालेले संपूर्ण नुकसान भरून द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली.
चार खोल्यांपैकी एका खोलीत विमलबाई डोणे ही ६२ वर्षांची महिला भाड्याने राहते. खोलीत त्या व त्यांची मुलगी मयुरी (१८) या दोघी दुपारच्या वेळी झोपल्या होत्या.
४मात्र, छत पडण्याच्या १० मिनिटे आधीच दोघी जणी झोपेतून उठल्या व साखर आणण्यासाठी किराणा दुकानावर गेल्या. त्याचवेळी मोठा आवाज झाला. या आवाजाने धावपळ उडाली.
४विमलबाई जिथे राहतात त्या खोलीच्या पाठीमागील इमारतीचे सेंट्रिंग त्यांच्या खोलीच्या छतावर कोसळले. हे पाहून त्यांना धक्काच बसला. पण नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, असे विमलबाई सांगत होत्या.