अद्यापही चार डझन गावे टँकरच्या पाण्यावरच!
By Admin | Updated: July 27, 2014 01:15 IST2014-07-27T00:16:08+5:302014-07-27T01:15:46+5:30
जालना : पावसाळ्याचे दोन महिने उलटल्यानंतर सुद्धा या जिल्ह्यात सुमारे चार डझन गावे टँकरच्या पाण्यावरच तहान भागवत आहेत.

अद्यापही चार डझन गावे टँकरच्या पाण्यावरच!
जालना : पावसाळ्याचे दोन महिने उलटल्यानंतर सुद्धा या जिल्ह्यात सुमारे चार डझन गावे टँकरच्या पाण्यावरच तहान भागवत आहेत.
दरम्यान, या जिल्ह्यात अंबड तालुक्यास सर्वाधिक १७ टँकर सुरु असून, जिल्ह्यात एकूण ३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती जिल्हा महसूल प्रशासनाने दिली.
या जिल्ह्यात यावर्षी बऱ्यापैकी पाऊस होईल असे अपेक्षित होते. परंतु मृग नक्षत्र बरसलेच नाही. त्यापाठोपाठ आर्द्रानेही पाठ फिरविली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले. आज ना उद्या पाऊस होईल म्हणून शेतकऱ्यांनी अपेक्षा बाळगल्या परंतु, जुलै अखेरपर्यंत सुद्धा या जिल्ह्यास समाधानकारक पाऊस झालाच नाही.
या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यात यावर्षी पाण्याचे संकट उभे राहिल की काय अशी भीती निर्माण झाली. परंतु गेल्या आठवड्यात दोन दिवस पडलेल्या भीज पावसामुळे टंचाइचे संकट थोडेसे का असेना दूर झाले आहे. परंतु भविष्यातही टंचाईचे संकट कायम आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटल्यानंतर सुद्धा चार डझन गावांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. ही गावे टँकरच्या पाण्यावरच दररोज तहान भागवित आहेत. येत्या आठ ते पंधरा दिवसांत दमदार पाऊस न पडल्यास टँकरच्या संख्येत वाढ होईल अशी भीती व्यक्त होत असून, त्यामुळे प्रशासनाने तालुकानिहाय टंचाईचा आढावा घ्यावयास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
अंबड तालुक्यात १७ टँकर सुरू
जिल्ह्यात ३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. सर्वाधिक गावे अंबड तालुक्यातील आहेत. या तालुक्यात १७ टँकर सुरु आहेत. रोहिलागड वगैरे भागांमधून हे टँकर दररोज पाणीपुरवत आहेत.
या तुलनेत परतूर व मंठा तालुक्यात एकही टँकर सुरु नाही. मात्र जालना पाच, बदनापुरात नऊ, जाफराबाद दोन, भोकरदन एक आणि घनसावंगी तालुक्यात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात एक टक्काही वाढ झाली नसल्याची धक्कादायक माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या जिल्ह्यातील सातपैकी पाच मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. उर्वरित दोन प्रकल्पांतील पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील बहुतांश लघूप्रकल्प कोरडे असून, त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या गावांमधून चिंतेचे वातावरण पसरले आहे.