मराठवाड्यातील चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच
By Admin | Updated: September 12, 2016 23:24 IST2016-09-12T23:17:17+5:302016-09-12T23:24:34+5:30
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे.

मराठवाड्यातील चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे विभागातील लहान मोठे तलाव, धरणे रिकामीच आहेत. विभागातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्प मृतसाठ्यातूनही बाहेर येऊ शकलेले नाहीत. उर्वरित प्रकल्पांमध्ये सरासरी ३४ टक्केच पाणीसाठा आहे. मराठवाड्यात केवळ विष्णूपुरी हा एकच प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.
मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अपुरा पाऊस पडत आहे. त्यामुळे दरवर्षीच मराठवाडा विभाग दुष्काळात होरपळून निघत आहे. यंदा पावसाने चांगली सुरुवात केली; परंतु महिनाभरापासून पावसाने जवळपास पाठ फिरविली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जलसाठ्यांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. विभागात लहान, मध्यम आणि मोठे असे मिळून एकूण ८४३ प्रकल्प आहेत. याशिवाय गोदावरी, मांजरा आणि इतर नद्यांवर सुमारे ३९ बंधारे आहेत. या सर्वांची साठवण क्षमता ७२९९ दलघमी आहे. परंतु या धरणांमध्ये आतापर्यंत एकूण २५५० दलघमी म्हणजे ३४ टक्केच पाणीसाठा होऊ शकला आहे. ८२९ लघु प्रकल्पांमध्ये ३२ टक्के आणि ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये २२ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.
जायकवाडीसह मराठवाड्यात एकूण अकरा मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे चार प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या धरणांच्या उपयुक्त साठ्यात थोडेही पाणी आलेले नाही. विभागात केवळ नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी हे एकमेव धरण शंभर टक्के भरले आहे. तर निम्न दुधना धरणात ७० टक्के, जायकवाडी धरणात ६४ टक्के, सिद्धेश्वर धरणात ३० टक्के, निम्न मनार धरणात १० टक्के, येलदरी धरणात ११ टक्के जलसाठा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस
मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ५२ टक्केच पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात ७७ टक्के, हिंगोली ७२ टक्के, नांदेड ७१ टक्के, लातूर ७० टक्के, औरंगाबाद ६३ टक्के, परभणी ६० टक्के आणि बीड जिल्ह्यांत ५६ टक्केच पाऊस झाला आहे.