चार बीईओंची ‘दफ्तर’ दिरंगाई !
By Admin | Updated: December 9, 2015 00:42 IST2015-12-09T00:20:07+5:302015-12-09T00:42:18+5:30
बीड : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे अपेक्षेप्रमाणे कमी झाले का? याच्या तपासणीचे आदेश शासनाने दिले होते; परंतु चार तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुदत उलटूनही अहवाल दिलाच नाही.

चार बीईओंची ‘दफ्तर’ दिरंगाई !
बीड : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे अपेक्षेप्रमाणे कमी झाले का? याच्या तपासणीचे आदेश शासनाने दिले होते; परंतु चार तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुदत उलटूनही अहवाल दिलाच नाही. त्यामुळे दफ्तर तपासणीच्या कामातही दफ्तर दिरंगाई झाल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्याच्या एकूण वजनाच्या साधारण दहा टक्के वजन दफ्तराचे असावे असे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. या आदेशाची अंमलबजावणी झाली का? हे पाहण्यासाठी दफ्तरांच्या वजनाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
एकत्रित अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांना नोव्हेंबरअखेरच मिळणे गरजेचे होते;परंतु पाटोदा, गेवराई, केज, वडवणी या तालुक्यांचे अहवाल प्रलंबितच आहेत.
१ व २ डिसेंबर रोजी शिक्षण संचालकांनी राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत बीडची दफ्तरांच्या वजनाची माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे संचालकांनी नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर शिक्षणाधिकारी (प्रा.) शशीकांत हिंगोणेकर यांनी ३ डिसेंबरपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले;परंतु त्यानंतरही चार गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)