शेततळ्यावर जोपासताहेत चार एकर शेवगा !

By Admin | Updated: December 29, 2014 00:56 IST2014-12-29T00:51:23+5:302014-12-29T00:56:18+5:30

भूूम : मागील दोन-तीन वर्षांपासून वालवड सर्कलमध्ये सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम आहे.

Four acres of farming will be growing! | शेततळ्यावर जोपासताहेत चार एकर शेवगा !

शेततळ्यावर जोपासताहेत चार एकर शेवगा !


भूूम : मागील दोन-तीन वर्षांपासून वालवड सर्कलमध्ये सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम आहे. त्यामुळे सध्या एकट्या वालवड येथे तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा या दुष्काळी स्थितीला दुषणे न देता याच सर्कलमधील राळेसांगवी येथील शेतकऱ्याने सुमारे दोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले आहे. आज त्याच पाण्यावर थोड्याथोडक्या नव्हे, तर चार एकरांवरील शेवगा जोपासला जात आहे.
अत्यल्प पावसामुळे गतवर्षी भूम तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक खालावली होती. यंदाही सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे वालवड सर्कलमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद आहे. त्यामुळेच की काय, एकट्या वालवड गावाची तीन टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे. अत्यल्प पावसामुळे आणि सिंचनाची शाश्वत सुविधा नसल्याने शेती व्यवसायही अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी शेतीच्या उत्पन्नमध्ये कमालीची घट झाली आहे. असे असतानाच याच सर्कलमधील राळेसांगवी येथील शेतकरी भरतरी टाळके यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फलोत्पादन या योजनेतून शेततळे बांधले आहे. यासाठी सुमारे सात लाख रूपये खर्च झाले असून या तळ्याची क्षमता २ कोटी १६ लाख लिटर इतकी आहे.
दरम्यान, शेतकरी टाळके यांनी या शेततळ्याच्या पाण्यावर सुमारे चार एकरावर शेवग्याची लागवड केली आहे. ठिबक सिंचनच्या माध्यमातून शेवग्याला पाणी दिले जात आहे. त्यामुळे शेवग्याची वाढही अपेक्षेप्रमाणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून किमान अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळेल, असेही ते म्हणाले. अत्यल्प पावसामुळे न डगमगता, टाकळे यांनी एकप्रकारे या भागातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Four acres of farming will be growing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.