शहागड येथे वृद्धाचे प्रेत विहिरीत आढळले
By Admin | Updated: December 28, 2015 23:20 IST2015-12-28T23:01:07+5:302015-12-28T23:20:26+5:30
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील शहागड येथील वृध्दाचा खून करण्यात आल्याची घटना २७ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. वृद्धाचा मृतदेह परिसरातील एका विहिरीत आढळून आला.

शहागड येथे वृद्धाचे प्रेत विहिरीत आढळले
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील शहागड येथील वृध्दाचा खून करण्यात आल्याची घटना २७ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. वृद्धाचा मृतदेह परिसरातील एका विहिरीत आढळून आला.
मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आल्यानंतर गोंदी पोलिस ठाण्यात रात्री अज्ञात व्यक्तिविरूध्द गुन्हा दाखल झाला. परिसरात १५ दिवसांत खुनाची ही दुसरी घटना आहे. या दोन्ही घटनेचा गोंदी पोलिसांकडून तपास पूर्ण झालेला नाही.
शहागड येथे राष्ट्रीय महामार्गालगत असलेले मुंबई येथील तसेच शेती व्यवसाय व इतर व्यवसायासाठी अनेक वर्षापासून राहत असलेले शेख हुसेन शेख कासम यांचा अज्ञात व्यक्तीने खून केला.
गावातील सिराज अब्बास कुरेशी हरवलेली शेळी पाहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी ही माहिती गोंदी पोलिसांना कळवताच कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
पोलिसांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढल्यानंतर शेख हुसेन यांचा असल्याचा कळले.
हा खून नेमका कधी झाला, कशासाठी झाला याचे कारण मात्र समजले नाही. २७ डिसेंबर रोजी हा मृतदेह विहिरीत आढळल्याने हा प्रकार निदर्शनास आला.
गोंदी पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र हे श्वान घटनास्थळ ते रस्त्यापर्यंतच घुटमळले. उपविभागीय पोलिस अधिकारी तेजीस्वनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली.
शहागड येथील खुनाची घटना निदर्शनास येऊन २४ तास उलटले तरीही अद्यापही कुठलेच धागेदोरे पोलिसांना लागलेले नाहीत. फक्त तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अचानक खून झाल्याने शहागडसह परिसरात भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)
गोंदी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १५ दिवसांत घडलेला दोन्ही खुनाच्या घटनेसंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता. त्या म्हणाल्या की, या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. त्यांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही. पोलिस या घटनेतील आरोपींचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांच्या हाती धागेदोरे सापडताच आरोपींना तात्काळ जेरबंद करु.