परंड्याच्या किल्ल्याचे रूपडे बदलणार
By Admin | Updated: October 15, 2016 01:00 IST2016-10-15T00:55:52+5:302016-10-15T01:00:47+5:30
परंडा : राज्यातील सुस्थितीत असलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून परंड्याच्या भुईकोट किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्याचे आता लवकरच रूपडे बदलणार आहे.

परंड्याच्या किल्ल्याचे रूपडे बदलणार
परंडा : राज्यातील सुस्थितीत असलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून परंड्याच्या भुईकोट किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्याचे आता लवकरच रूपडे बदलणार आहे. किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाने साडेचार कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील एक कोटीच्या निधीची तरतूद चालू वर्षासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा भुईकोट किल्ला मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांचा सामना करीत आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी मलब्याचे ढिग पडले आहे, तर झाडे-झुडुपे वाढल्याने किल्ल्याचे अभेद्य बुरूजही संकटात सापडले आहे. विशेष म्हणजे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठीही सोयी-सुविधा नसल्याने याबाबत पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर आ. सुजितसिंह ठाकूर यांनी किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चार कोटी ७२ लाख ७१ रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर आता मंजूर निधीपैकी २०१५-१७ या आर्थिक वर्षासाठी एक कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निधीतून किल्ल्यातील मलबा काढणे, झाडे-झुडुपे काढणे, विहिरीतील गाळ काढणे, खंदकाच्या पडलेल्या भिंतीचे बांधकाम करणे, तसेच आतील पुरातन तहसील इमारत, महाफिजखाना, अंतर्गत दरवाजांची दुरुस्ती, भिंतींची रंगरंगोटी यांसह पर्यटकांकरिता स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पर्यटकांना बसण्याकरिता दगडी बेंचेस आदी कामे करण्यात येणार आहेत.