पूर्वमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून खेचाखेची
By Admin | Updated: September 28, 2014 01:04 IST2014-09-28T00:30:36+5:302014-09-28T01:04:03+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवार ठरविताना भाजपामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्रचंड खेचाखेची झाली.

पूर्वमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून खेचाखेची
औरंगाबाद : औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवार ठरविताना भाजपामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत प्रचंड खेचाखेची झाली. समझोत्याचे सर्वच उपाय खुंटल्यामुळे नेत्यांनी शक्कल लढवून इच्छुक संजय केणेकर व अतुल सावे यांना थेट निवडणूक कार्यालयात पाठवून दिले. उमेदवारी दाखल करण्यास शेवटचा अर्धा तास उरला असताना एबी फॉर्म एकाच्या हाती सोपवला आणि दुसऱ्याला तेथील पोलीस बंदोबस्तामुळे राग व्यक्त करता येणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वमधून कुणाला उमेदवारी द्यावी, याचा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी बैठक बोलाविण्यात आली होती. संजय केणेकर व अतुल सावे हे दोघेही तेथे उपस्थित होते. दानवे यांनी दोघांमध्ये समेट घडवून एकाने माघार घ्यावी, यासाठी तीन तास घालविले; परंतु दोघेही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे निर्णय न घेताच दानवे यांच्या निवासस्थानावरील बैठक संपली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दानवे यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्मही होता; परंतु दोघांमध्ये एकमत होत नसल्यामुळे त्यांनी तो तेथे देण्याचे टाळले; अन्यथा त्यांच्या निवासस्थानीच इच्छुकांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता होती. हा अनर्थ टाळण्यासाठी कोणताही निर्णय न होताच तेथील बैठक आटोपती घेण्यात आली व दोघांनाही निवडणूक कार्यालयात पाठवून देण्यात
आले.
केणेकर व सावे एकापाठोपाठ निवडणूक कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर काही वेळाने प्रदेश सरचिटणीस ठाकूर हे एबी फॉर्म घेऊन आले. तोपर्यंत निवडणूक कार्यालयात संजय केणेकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले होते. ठाकूर व केणेकर यांच्यातील संवाद बिघडताच हे कार्यकर्ते बिथरले होते; परंतु पोलिसांनी सर्वांना परिसरातून बाहेर काढले. नेत्यांचा तणावाचा अर्धा तास पोलिसांच्या उपस्थितीत सुरक्षित गेला. या काळात केणेकर यांचे वरिष्ठांशी बोलणेही करून देण्यात आले व प्रकरण निस्तरले.
सेनेत जाण्याचीही तयारी...
ही घडामोड सुरू असताना दुसऱ्या बाजूला अतुल सावे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यास त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने सावे यांचा एबी फॉर्म तयार केला होता. त्याचमुळे कला ओझा यांची उमेदवारी दाखल करण्यास विलंब केला जात होता; परंतु सावे यांचे कार्यकर्ते भाजपाकडे जमल्याचे समजताच ओझा यांची उमेदवारी दाखल करून घेण्यात आली.