छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील सिरसगावचे माजी सरपंच राजाराम ऊर्फ राजू भावसिंग चुंगडे (४७) यांच्या हत्येचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. चुंगडे यांची हत्या त्यांच्याच गावातील तीन तरुणांनी पूर्व वैमन्यस्यातून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. वर्षभरापूर्वी सर्वांसमक्ष आरोपीला मारहाण केली होती, त्याचा बदला घेण्यासाठी इतर दोघांच्या मदतीने राजाराम यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी रविवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य आरोपी आनंद अमर राजपूत, समीर समद कुरेशी आणि इरफान शकील शहा (सर्व रा. सिरसगाव) अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी डॉ. राठोड म्हणाले की, राजाराम चुंडे हे १२ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता त्यांच्या शेतवस्तीवरील घरासमोर मोबाइल पाहत बसलेले असताना, दुचाकीने ट्रिपलसीट आलेल्या दोन तरुण व महिलेने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करून हत्या केली होती. याप्रकरणी कन्नड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. या घटनेचा एक प्रत्यक्ष साक्षीदार होता. मात्र, अन्य पुरावा नव्हता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आराेपी आनंद राजपूत यास ताब्यात घेतले असता, त्याने पाच तासांच्या चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली. वर्षभरापूर्वी आरोपीला सर्वांसमक्ष गावांत मारहाण केली होती, त्याचा बदला घेण्यासाठी समीर आणि इरफान यांच्या मदतीने राजारामची हत्या केल्याचे सांगितले. या हत्येत कोणत्याही महिलेचा सहभाग नसून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी इरफान हा महिलेचा पेहराव करून आल्याचे सांगितले.
हत्येनंतर श्रीरामपूर येथे सासूरवाडीत पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना रात्री मोठ्या शिताफीने पकडल्याचे अधीक्षकांनी सांगितले. दोन्ही आरोपींची स्वतंत्र चौकशी केली असता, समीर याने प्रत्येक निवडणुकीत राजारामला मदत केली होती. मात्र, गावात त्याच्यावर ॲट्राॅसिटीचा गुन्हा नोंद झाला, तेव्हा त्यांनी मदत न केल्याचा राग होता. तर, कब्रस्तानच्या जागेसाठी राजाराम हे समाजाला मदत करीत नसल्याचा राग इरफानला होता. या रागातून त्यांनी आनंदच्या मदतीने राजारामला संपविण्याचा कट रचल्याची कबुली दिली.
जुन्या गुन्ह्याच्या शस्त्राचाच वापरमाजी सरपंच राजाराम चुंगडे यांची हत्या करण्यासाठी वापरलेला कोयता आरोपींनी फेकून दिला आहे. या कोयत्यानेच आरोपी इरफान याने कन्नड शहरात एकावर हल्ला केला होता. या गुन्ह्यात तो फरार होता. कन्नडमध्ये ज्या कोयत्याने हल्ला केला त्याच कोयत्याने चुंगडे यांची हत्या आरोपींनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यांनी केली कारवाईपोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि. संतोष मिसळे, पवन इंगळे, सुधीर मोटे, हवालदार श्रीमंत भालेराव, वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, अशोक वाघ, महेश बिरुटे, योगेश तरमाळे आणि कन्नडचे सपोनि. रामचंद्र पवार यांनी ही कारवाई केली.