माजी उपमहापौर सुरेश पवार यांचा काँग्रेसला झटका; भाजपात प्रवेश
By Admin | Updated: March 3, 2017 01:31 IST2017-03-03T01:29:41+5:302017-03-03T01:31:23+5:30
लातूर : काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व देशमुख गटाचे खंदे समर्थक माजी उपमहापौर सुरेश पवार यांनी काँग्रेसला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जबर झटका दिला आहे़

माजी उपमहापौर सुरेश पवार यांचा काँग्रेसला झटका; भाजपात प्रवेश
लातूर : काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व देशमुख गटाचे खंदे समर्थक माजी उपमहापौर सुरेश पवार यांनी काँग्रेसला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जबर झटका दिला आहे़ त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गुरूवारी सकाळी १०$:३० वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा देत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी औरंगाबाद गाठले व तेथे सुभेदारी विश्रामगृहावर भाजपात प्रवेश केला़ पंधरा दिवसापूर्वीच भाजपात प्रवेश केलेल्या अख्तर मिस्त्री यांनी काँग्रेसला पहिले खिंडार पाडताना सुरेश पवारांना भाजपात नेले आहे़
काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर सुरेश पवार गेल्या पाच टर्मपासून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत़ मनपा अस्तित्वात आल्यानंतर पहिले उपमहापौर म्हणून त्यांची निवड होवून अडीच वर्षे ते पदावर होते़ याशिवाय, उपनगराध्यक्ष एकदा व एकदा बांधकाम सभापती अशी पदे त्यांनी भूषविली आहेत़ ते निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत़ गुरूवारी सकाळी १०़३० वाजता माजी महापौर अख्तर शेख यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जावून सुरेश पवार यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा सादर केला़ यानंतर औरंगाबादला रवाना झाले़
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मनपा आयुक्तांकडे राजीनामा दिल्यानंतर सुरेश पवार यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करून ठेवला़ औरंगाबादेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या मुलाच्या लग्नासाठी आले होते़ येथे मुख्यमंत्री, लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन औपचारिक बोलणी करून भाजपात प्रवेश केला़ त्यांच्यासोबत असदमामू खोरीवाले यांनीही भाजपात प्रवेश केला़