छत्रपती संभाजीनगर : सुसाट स्पोर्टस बाईक चालकाच्या धडकेत माजी नगरसेवक अशोक गोरखनाथ वीरकर (५५, रा. गुलमोहर कॉलनी) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री १२ वाजता चिकलठाणा औद्याेगिक वसाहतीमधील ब्रँडी कंपनीसमोर हा अपघात झाला.
वीरकर गुरुवारी सायंकाळी कामानिमित्त चिकलठाणा परिसरात गेले होते. रात्री ११:३० वाजता ते घराकडे जाण्यासाठी बुलेटवर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या दिशेने जात होते. यावेळी उत्तरानगरीकडून धूत रुग्णालयाच्या दिशेने दोन तरुण सुसाट स्पोर्टस बाईक पळवत होते. ब्रँडी कंपनीसमोर त्यांचा तोल जाऊन ते समोरून येणाऱ्या वीरकर यांच्या गाडीला जाऊन धडकले. घटनेची माहिती कळताच अंमलदार समाधान उबाळे, साहेब खान पठाण यांनी तत्काळ धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी वीरकर यांना घाटी रुग्णालयात नेले. मात्र, रात्री एक वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
वेग इतका की हात, डोके फुटलेस्पोर्टस बाईकवरील शेख अमान शेख इरफान व शेख शब्बीर शेख अतिक (दोघे रा. पाॅवरलूम) यांच्या दुचाकीचा वेग इतका होता की, धडकेचा मोठा आवाज झाला. वीरकर दुचाकीसह दूर फेकले गेले. त्यांचा उजवा हात तीन ठिकाणी तुटला; तर डोके, चेहऱ्याला जबर मार लागला. अमान व शब्बीरदेखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंमलदार साहेब खान पठाण तपास करत आहेत.
राजकीय क्षेत्रातून हळहळवीरकर गुलमोहर कॉलनीचे नगरसेवक राहिले हाेते. आविष्कार कॉलनीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या वीरकर यांच्या जाण्याने नागरिकांसह राजकीय क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.