विदेशी महिलेवर हल्ला; ४ वर्षे शिक्षा
By Admin | Updated: April 30, 2016 00:09 IST2016-04-29T23:44:46+5:302016-04-30T00:09:05+5:30
औरंगाबाद : झेक प्रजासत्ताकच्या महिलेला लुटण्याच्या उद्देशाने हल्ला करणारा आरोपी भगवान पाटोळे याला चार वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विदेशी महिलेवर हल्ला; ४ वर्षे शिक्षा
औरंगाबाद : शेंद्रा येथील कंपनीत इंटर्नशिपसाठी आलेल्या झेक प्रजासत्ताकच्या रहिवासी महिलेला लुटण्याच्या उद्देशाने हल्ला करणारा आरोपी भगवान पाटोळे याला सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी चार वर्षे सक्तमजुरी व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी लेंका रेज मोनोव्हा (२३, रा. रो-हाऊस क्र.१३, स्कोडा शेंद्रा) या झेक प्रजासत्ताकच्या महिलेने चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार ५ सप्टेंबर २०१२ रोजी एक अनोळखी इसम तिच्या रूममध्ये घुसला. त्याने तिला मारहाण केली व चावा घेतला. तिने मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा तो पळून गेला. त्यानंतर तिच्या खोलीची पाहणी केली असता तिची हँडपर्स नसल्याचे आढळून आले.
प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी व पोलीस उपअधीक्षक पल्लवी बर्वे यांनी करून भगवान पाटोळे , सोनाजी मोहन गांगे व शे. अफसर शे. दगडू यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील राजू एस. पहाडिया यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वॉचमन गणेश लोखंडे याची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी क्र. १ भगवान पाटोळे याला वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.