कपाशीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज
By Admin | Updated: April 18, 2016 00:59 IST2016-04-18T00:59:54+5:302016-04-18T00:59:54+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा कपाशीच्या क्षेत्रात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे.

कपाशीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज
औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा कपाशीच्या क्षेत्रात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने वाढून ४ लाख २५ हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
गतवर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात खरिपाची उशिराने पेरणी झाली. त्यामुळे खरिपाचे क्षेत्र घटले होते. कपाशी, सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मूग, उडीद अशा सर्व प्रकारच्या पिकांची मिळून एकूण ६ लाख ४९ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. मात्र, यंदा हे क्षेत्र ८६ हजार हेक्टरने वाढविण्याचा अंदाज कृषी विभागाने खरीप हंगामाच्या अहवालात दर्शविला आहे. यामध्ये सर्वाधिक ३० हजार हेक्टर क्षेत्र हे कपाशीचे वाढणार असून, त्यापाठोपाठ बाजरी, मका यासारख्या तृणधान्याच्या क्षेत्रात १५ हजार हेक्टरची वाढ होणे अपेक्षित आहे. सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग यासारख्या तेलबियांचे क्षेत्र काही प्रमाणात वाढेल, असे कृषी विभागाने म्हटले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. यंदा हे क्षेत्र ४ लाख २५ हजार हेक्टर होणे अपेक्षित आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक ८७ हजार हेक्टर इतके कपाशीचे क्षेत्र राहील. तर कपाशीचे सर्वात कमी २४ हजार हेक्टर क्षेत्र हे सोयगाव तालुक्यात असेल. तृणधान्याचे क्षेत्र यंदा २ लाख १५ हजार हेक्टर आणि तेलबियांचे क्षेत्र २३ हजार हेक्टर होण्याचा अंदाज आहे.
देशी कपाशीचे क्षेत्र ५० हजार
जिल्ह्यात सर्वत्र बीटी कपाशीची लागवड होते. परंतु कृषी विभागाकडून यंदा देशी कापसाच्या वाणासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यात किमान ५० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाच्या देशी वाणाची लागवड केली जाईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.