शहर विकासाला सेना-भाजपकडून खीळ
By Admin | Updated: July 13, 2017 00:50 IST2017-07-13T00:50:37+5:302017-07-13T00:50:55+5:30
जालना : नगरपालिकेच्या माध्यमातून काँग्रेसकडून शहराचा विकास केला जात आहे.

शहर विकासाला सेना-भाजपकडून खीळ
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगरपालिकेच्या माध्यमातून काँग्रेसकडून शहराचा विकास केला जात आहे. मात्र, या विकासकामांना शिवसेना आणि भाजपकडून खीळ घातली जात असल्याचा आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, पालिकेची ३० मे रोजी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेत अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले. यात स्वच्छतेसाठी ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी खर्च करावयाचा होता. यातून २०० स्वच्छता कामगारांची नियुक्ती, १२ घंटागाड्यांची खरेदी करण्यात येणार होती. मात्र, शिवसेना आणि भाजप सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला. तसेच ही सभाच रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्याकडे केली.
जिल्हाधिकारी जोंधळे यांनी या सभेतील सर्व निर्णय रद्द केले. याचा परिणाम शहरातील विविध विकास कामांवर झाल्याचे गोरंट्याल यांनी नमूद केले. तसेच खा. रावसाहेब दानवे यांच्या इशाऱ्यावर जिल्हाधिकारी काम करीत असल्याचा आरोपही नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी केला.