रेशनच्या काळ्या बाजाराला आळा
By Admin | Updated: September 3, 2014 00:20 IST2014-09-03T00:18:05+5:302014-09-03T00:20:20+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे रेशनवरील काळ्या बाजाराला काही प्रमाणात आळा बसला आहे.

रेशनच्या काळ्या बाजाराला आळा
औरंगाबाद : जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे रेशनवरील काळ्या बाजाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. बायोमेट्रिक मशीन बसलेल्या दुकानांवर कधी नव्हे ते लाभार्थ्यांचे धान्य शिल्लक राहत आहे. आॅगस्ट महिन्याअखेरीस तब्बल ८४ टक्के केशरी कार्डधारकांचे धान्य या दुकानांवर शिल्लक राहिले आहे. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील बहुतांश लाभार्थ्यांचे धान्यही शिल्लक दिसून आले आहे.
अनेक लाभार्थी रेशन दुकानावरून अन्नधान्य नेत नाहीत. तरीही दुकानदारांकडून सर्वच लाभार्थ्यांनी धान्याची उचल केल्याचे दाखवून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते. या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्षभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत लागू केली. या अंतर्गत लाभार्थ्याच्या बोटाचे ठसे घेऊनच त्यांना धान्याचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १७७७ पैकी २७ दुकानांवर ही पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित दुकानदारांना टॅब्लेट देण्यात आले आहेत. बोटाचे ठसे जुळल्यानंतर लगेचच टॅब्लेटद्वारे त्याची आॅनलाईन नोंद होते. त्यामुळे कोणत्या आणि किती लाभार्थ्यांनी धान्य नेले, कोणत्या लाभार्थ्यांनी धान्य उचलले नाही, हे लक्षात येते. त्यामुळेच आता कधी नव्हे ते रेशन दुकानांवर धान्य शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद शहरातील ९, फुलंब्री तालुक्यातील ९ आणि गंगापूर तालुक्यातील ९ दुकानांवर सध्या बायोमेट्रिक यंत्रणा कार्यरत आहे. या दुकानांवर आॅगस्ट महिन्यात बहुतांश लाभार्थ्यांचे धान्य शिल्लक राहिले असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी मंगळवारी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या २७ दुकानांवर एपीएलचे (केशरी) १८ हजार कार्डधारक आहेत. यातील अडीच हजार कार्डधारकांनीच धान्य नेले.
अंत्योदय योजनेच्या २२ टक्के लाभार्थ्यांनीही रेशनकडे पाठ फिरविली. अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्यक्रम गटातील २४ टक्के लाभार्थ्यांनीही धान्य घेतलेले नाही. या दुकानांवरील प्राधान्यक्रम गटातील लाभार्थ्यांची संख्या ७७०० इतकी आहे. यापैकी १८०० जणांनी धान्य उचलले नाही.