चारा,पाण्याचा प्रश्न गंभीर
By Admin | Updated: August 17, 2014 00:31 IST2014-08-17T00:28:38+5:302014-08-17T00:31:27+5:30
हिंगोली : जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने पशूपालकांनी जनावरांना कसायाच्या दावणीला बांधण्यास सुरूवात केली.

चारा,पाण्याचा प्रश्न गंभीर
हिंगोली : पैशांपायी नगदी पिके घेण्याचा कल वाढल्यामुळे चारावर्गीय पिकांकडे साफ दुर्लक्ष झाले असताना यंदा पाऊस लांबला. परिणामी जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्याने पशूपालकांनी जनावरांना कसायाच्या दावणीला बांधण्यास सुरूवात केली. शिवाय खरीप हंगामातही ज्वारी आणि मक्याचे क्षेत्र घटल्याने भविष्यात चाराटंचाईचा प्रश्न भेडसावणार आहे. दुसरीकडे पावसाळ्यात ३५ विंधन विहिरीचे प्रस्ताव आल्याने पाणी टंचाईने रौद्ररूप धारण करण्यास सुरूवात केली. परिणामी चारा व पाण्याच्या नियोजनासंदर्भात शनिवारी अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी यांनी बैठक घेतली.
जिल्ह्यात दीड महिन्यांच्या उशिराने दाखल झालेल्या पावसात सातत्य नाही. अद्यापही एकही नदी, नाला, ओढा वाहिला नसल्याने चारा आणि पाणीटंचाईने डोके वर काढले. आजघडीला २ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना ३५ विंधन विहिरीचे प्रस्ताव आले आहेत. अद्याप पावसाळाही सरला नसताना धरणांत पुरेसे पाणी उपलब्ध नाही. पाणीपुरवठ्याच्या बहुतांश योजना बंद असताना काही ठिकाणी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरलेला नाही.
लवकर पाऊस न झाल्यास गावागावात पाणीटंचाईने ग्रामस्थांची भटकंती वाढेल. आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना चाऱ्यापायी पशूपालकांनी जनावरांना बाजार दाखवण्यास सुरूवात केली.
गतवर्षी खरिपात अतिवृष्टी आणि रबी हंगामात अवकाळी पावसाने चाराच नष्ट झाल्याने यंदा चाराटंचाई उद्भवली. यंदाच्या खरीपात चारावर्गीय पिकांना उत्पादकांनी नाकारले. ४४ हजार ८९० पैकी १२ हजार हेक्टवर ज्वारी आणि केवळ १ हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली.
या क्षेत्रावरील पिकांचा चारा साडेचार लाख जनावरांची भूक भागविणारा नाही. आताच चाराटंचाईने पशुपालक हैराण असताना भविष्यात जनावरांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)