चारा वाहतुकीस जिल्ह्याबाहेर बंदी
By Admin | Updated: November 6, 2014 01:34 IST2014-11-06T00:45:34+5:302014-11-06T01:34:37+5:30
जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत चारा कमी प्रमाणात असल्याने आगामी काळात चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचे आदेश काढले

चारा वाहतुकीस जिल्ह्याबाहेर बंदी
जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत चारा कमी प्रमाणात असल्याने आगामी काळात चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदीचे आदेश काढले आहेत. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जालना तहसील कार्यालयात संभाव्य टंचाई आढावा बैठक घेतली.
यावर्षी जिल्ह्यात अपेक्षित सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत लघू तसेच मध्यम प्रकल्पांत १७ टक्केच पाणीसाठा आहे. ६४ पैकी ५ प्रकल्प कोरडेठाक आहेत. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे अनेक गावात पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात बहुतांश गावांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागेल अशी भीती सर्वदूर व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याने भीषण दुष्काळ अनुभवला होता. यंदाही तिच परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती आहे. विशेषत: जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. विहिरी व कूपनलिकांमधील पाणी पातळी घटली आहे. यामुळे रबी पेरणीही धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत पशुधनही कमी झाले आहे. फेबु्रवारीपर्यंत पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी केली असून त्यांनी याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी काढले.
संभाव्य पाणी व चारा टंचाई लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर पूर्वनियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी नायक यांनी आज सकाळी जालना तालुक्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेतला. यानिमित्त येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा, तहसीलदार रेवननाथ लबडे यांची उपस्थिती होती.
सर्व जलसाठ्यांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना बंद पडल्या, त्या सुरू करण्याची सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे वीजपुरवठ्याच्या अडचणीमुळे ज्या योजना बंद आहेत, त्याबाबत महावितरणने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ७ मध्यम तर ५७ लघू प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांत २६ टक्के तर लघू मध्ये १४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी मध्यम मध्ये २ नोव्हेंबर २०१३ पर्यंत ५९ तर लघू मध्ये ४६ टक्के पाणीसाठा होता. सध्या सर्व प्रकल्प मिळून केवळ १७ टक्के पाणी आहे. ५७ लघू प्रकल्पांपैकी ४ कोरडेठाक तर तब्बल २४ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याच्याखाली आहे.
४जिल्हाधिकारी नायक हे स्वत: संभाव्य टंचाईसंदर्भात तालुकानिहाय आढावा बैठका घेणार असून त्यात तांत्रिक अडचणी दूर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.